21 January 2010

गोविंदाज...

जानेवारी २००७माझे खाण्या-पिण्याचे जाम नखरे होते..कधी आईने उपमा,पोहे केले की मला आवडत नाही !!! असे म्हणून या रुचकर पदार्थांना मी सरळ नाकारायचो.आईच्या हातच्या या पदार्थांची चवीची किंमत मला आता व्यवस्थीथ कळली होती आणि तेच पदार्थ आता मिळणे मुष्किल झाले होते कारण मी त्यावेळी डेन्मार्क मध्ये ट्रेनिंगसाठी गेलेलो होतो.भारतीय पदार्थ किती रुचकर असतात आणि मी किती माज करायचो हे आता मला समजले होते.

मोठ्या मुश्किलीने दादरा या नावाचे एका सरदारजीचे दुकान सापडले,त्याचा पत्ता तिकडच्याच एका छोट्याश्या नेट्टो नावाच्या दुकानात( अगदी छोट्या मॉलच्या चेनच्या दुकानांपैकी एक) कामास असणार्‍या शर्माने दिला होता.(पृथ्वीवर कुठेही गेलात तरी सरदारजी कुठेही सापडतील याची आता मला खात्री पटली होती... ;) ) शर्माकडे बर्‍याचवेळा आम्ही रोजचेच लागणारे सामान जसे ब्रेड,दूध,अ‍ॅपल ज्यूस इ. घेण्यासाठी जात असू...त्याने तिथल्याच एका डॅनिश बाईशी लग्न केले होते,आणि त्याला एक मुलगा सुद्धा होता.भारतीय पद्धधीचे जेवण कुठे मिळू शकेल काय असे विचारल्यावर त्याने त्या सरदारजीच्या दुकानाचा पत्ता दिला.आम्ही (मी आणि माझा सहकारी) ते दुकान शोधून काढले आणि पहिला पदार्थ खाल्ला तो म्हणजे समोसा.आ.हा.. हा... गरम गरम समोसा तिकड्यच्या थंडीत खाताना अक्षशः आम्ही नाचलो...भारतीय खाण्याचा शोध घेताना आम्हाला हा पदार्थ चाखायला मिळाला.

आता दुकान तर सापडले होते...त्यामुळे वेळ मिळेल तसा त्या दुकानाकडे धाव घेणे याचीच आम्हाला मजा वाटू लागली होती.त्याच्याकडे पराठा सुद्धा मिळत होता.आम्ही शाकाहारी असल्यामुळे आमचे खाण्या-पिण्याचे जाम वांधे झाले होते...रोज सकाळ संध्याकाळ वरण-भात खाऊन खाऊन कंटाळलो होतो.अधून मधून जाम-ब्रेड आणि अ‍ॅपल ज्यूस यावर कसे बसे दिवस घालवत होतो,त्यामुळे आता समोसा आणि पराठा यांचा उगम सापडल्यामुळे आता जरा जेवायला मजा येऊ लागली होती.

आम्हाला वरण भाता शिवाय इतर काहीही जेवण बनवायला येत नव्हते.त्या तीन महिन्यात एव्हढा भात आणि ब्रेड खाल्ला की माझ्या अख्ख्या आयुष्यात मला या वस्तू परत खायला मिळू नयेत असे वाटायला लागले होते...एकदा घरी फोन केला होता तेव्हा आईला सांगितले की परत तिकडे आल्यावर मी ३ महिने तरी भात खाणार नाही,फक्त पोळीच खाईन.तसे मी नंतर केले देखील !!!.आता भारतीय जेवण अजून कुठे मिळेल अशी त्या सरदारजी कडे चौकशी केली...त्याने दोन-तीन रेस्टॉरंटची नावे सांगितली.आम्ही ती देखील शोधली,पण त्या हॉटेलच्या बाहेरुनच आम्हाला कळले की इथे जेवणे परवडणारे नाही. आता काय करायचं...

माझा वडिलांनी ईमेल करून मला तिथल्या अजून एका रेस्टॉरंटचा पत्ता कळवला,तो असा होता...


Denmark

Govindas

Norre Farimagsgade 82

DK-1364 Kbh K

Phone: +45 3333 7444

Websites : www.krishna.dk and www.harekrishna.dk

(पत्ता जालावरून घेतला आहे आता)


चला नाव आणि रेस्टॉरंटचा पत्ता कळला होता...आता ते फक्त हुडकून काढायचे बाकी होते.शेवटी एकदाचे गोविंदाज सापडले. पत्ता नीट लक्षात ठेवला आणि आता इथे येऊन कधी जेवायचे तो दिवस ठरवण्यासाठी आम्ही विचार करू लागलो,कारण आता आमचा तिसरा साथीदार सुद्धा येऊन पोहचला होता.त्यामुळे दोन जणांना एकत्र जेवण्यासाठी जाता येणार होते.इतके दिवस आम्ही दोघे जण तिथे होतो पण शिफ्ट करावी लागत असल्यामुळे आम्ही क्वचितच एकत्र कुठे जाऊ शकत होतो.

एकदाचा आम्हा दोघांना वेळ मिळालाच आणि संध्याकाळची मस्त वेळ ठरवून आम्ही गोविंदाज साठी निघालो.
आता आम्ही त्या रेस्टॉरंटच्या दाराशी उभे होतो,आता जाण्यासाठी दरवाजा ढकलला आणि...मस्त पैकी हरे कृष्णा-हरे रामा ची शांत धून कानावर पडली...आजूबाजूचा भिंतीवर भगवान श्रीकृष्णाच्या तसबिरी लावलेल्या होत्या...मंद प्रकाश आणि धुपासारखा वास आम्हाला लगेच हिंदुस्थानात घेऊन गेला.तिथे बरेचशे लोक गोरेच होते आणि आम्ही त्यांच्यात काळे.डेन्मार्क मधे एक संपूर्ण शाकाहारी जेवण मिळणारे हे एकमेव रेस्टोरंट असावे बहुधा...

बसण्यासाठी टेबल शोधताना तिथल्याच एका फिरंग्याचे बोल कानावर पडले.गाय हा किती उपयुक्त पशू आहे यावर त्यांची चर्चा चालू होती...हिंदुस्थानी लोक गायीची पुजा का करतात...असा काहीसा त्यांच्या चर्चेचा विषय होता...आम्ही त्यांच्या मागेच बसलो असल्याने त्यांचे विनोद,गप्पा सहज ऐकायला येत होते.

इथे एका काउंटरवर जाऊन आपल्याला हेवे ते पदार्थ खायला घायचे आणि त्याचे पैसे द्यायचे असा प्रकार होता.संपूर्ण थाळीचा पर्यंत सुद्धा होता.पदार्थ अगदी भारतीय दिसत नसेल पण त्याचा सुवास मात्र ते भारतीय असल्याची खात्री देत होता.
आम्ही दोघांनी थाळी घेतली..."अधश्या सारखे आम्ही त्या जेवणाकडे पाहत होतो.सुरवातीचा एक घास घेताच,मन आनंदाने भरून गेलं".इतक्या दिवसांचा शीण एकदम कुठेतरी गायब झाला होता.जेवणाला अगदी चंदनाचा स्वाद देखील लाभला होता...आम्ही मनसोक्त जेवलो,आणि तृप्त झालो.मंत्रमुग्ध वातावरण पदार्थांच्या चवी वाढवत होत्या.मला त्यांनी बनवलेले जेवण फार फार आवडले.पैसे दिल्यानंतर मी तिथल्या एका माणसाला विचारले की ज्यांनी हे जेवण बनवले आहे त्यांना आम्हाला भेटायची इच्छा आहे,तर ते भेटू शकतील काय ???. हो नक्कीच,,,तिथला तो गोर्‍या अगदी आनंदाने म्हणाला.आम्हाला तो त्या कउंटच्या मागे असलेल्या त्यांच्या किचन मध्ये घेऊन गेला...तिथे पांढर्‍या कपड्यात असलेले,डोक्यावर टोपी घातलेली...आणि कपाळाला चंदनाचा टिळा लावलेले दोन गोरे शेफ दिसले,त्यांना आम्ही सांगितले की आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि इथलं जेवण अगदी आमच्या पद्धतीच असल्यासारखं चवीला आहे आणि ते आम्हाला फार आवडलं,हे त्यांना सांगितल्यावर त्यांना फार आनंद झाला.त्यांनी आमची विचारपूस केली आणि बोलता बोलता ते म्हणाले या जेवणाचा आम्ही आधी भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतो,हे सर्व ऐकून आम्ही अगदी चकित झालो होतो.

त्यांनी मला विचारले की आमच्याकडे थोडा अजून वेळ आहे का ? मी सांगितले नक्कीच आहे.ते आम्हाला त्या रेस्टॉरंटच्या तळघरात घेऊन गेले,तिथे एका स्वामींची मूर्ती होती(बहुधा प्रभुपाद स्वामींची होती...) आणि भगवान श्रीकृष्णाचे छोटेसे असे देवघर होते.आम्ही घंटा वाजवून श्रीकृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केला व आम्हाला आम्ही कुठल्या दुसर्‍या देशात आहोत याचा विसर पडला.

तो क्षण मनात साठवून आम्ही त्या रेस्टॉरंटच्या बाहेर आलो,,,आता तिथल्या वास्तव्याचे काहीच दिवस उरले होते.---------------------------------------------------------------------------------------------

जानेवारी २०१०

काल आमची क्लायंट बरोबर चर्चा होती (इथे हिंदुस्थानात)चर्चा झाल्यानंतर त्यांना त्यांच्याच देशात असलेल्या या रेस्टॉरंट मध्ये एकदातरी जाऊन या असा मी सल्ला दिला. ;)


मदनबाण.....

13 January 2010

पेन ड्राइव्ह

तुमच्या कॉम्प्युटरची मेमरी कमी आहे,प्रोग्रॅम्स नीट रन होत नाहीत,लोड व्ह्यायला खूप वेळ घेतात. नवीन मेमरी विकत घ्यायचा सध्या विचार नाही.मग काय करावं !!!

तुमच्याकडे पेन ड्राइव्ह आहे ? मग त्यालाच तुम्ही तुमची एक्स्ट्रा मेमरी म्हणून वापरू शकता...

कसे ?

उत्तर :---

eBoostr™ http://www.eboostr.com


ट्राय करून पाहा,डेमो व्हर्जन ४ तास काम करते.

मदनबाण.....

इथे पण डोकवा :---
http://mazeyoutube.blogspot.com

07 January 2010

तोच स्वेटर...

नाना,क्या आप स्वेटर भी बनाते हो? (आमच्या इथे राहणार्‍या ख्रिश्चन आजीला सगळी मुले नाना अशी हाक मारायचे)हा बेटा बनाती हुं | मी लहान असताना तिला मी विचारलेला प्रश्न... ती हिवाळा येण्याचा आधी स्वेटर बनवायला घ्यायची, आणि ज्यांनी ज्यांनी सांगितले असेल,,, त्यांचे स्वेटर अगदी वेळेत तयार ठेवायची.

आंम्ही या ख्रिचन कुटुंबाच्या २ माळे खाली राहतो... बर्‍याच वेळेला ही म्हातारी आजी मला लिफ्ट मधून खाली जाताना भेटत असे, तेव्हा तिच्याशी बोलणं होत असे.

तिचा उत्साह नेहमी जबरदस्त असायचा... रोज फिरायला जाणे अगदी मस्ट!!! संध्याकाळ झाली की म्हातारी अगदी न चुकता फिरायला जाई,,,, तिचा अगदी न चुकणारा नियम!!! नाना, आप रोज घुमने जाती हो? (तिच्याशी काहीतरी बोलण्यासाठी अशी सुरुवात वेगवेगळ्या प्रश्नांनी मी करत असे... )हा... :---नाना. मुझे बोहोत अच्छा लगता है, आप को इस तरह रोज घुमने जाते हुऐ देखना, और वोह भी इस उम्र मै | :---मी.

अरे रोज चलने जाती हुं ना,,, इसिलीये इब तक चल पा रही हु... तिचं हे वाक्य माझं डोक्यात लक्षात राहिलं... (रोज चालतेय... म्हणून अजून टिकून आहे. )पण शेवटी वय झालं की शरीर तुमची साथ सोडू लागतं,,, करायचं बरंच असतं पण... शरीर मात्र काही साथ देत नाही !!! माणसाला पुन्हा येणारे बालपण... परावलंबनाची उलटी सुरुवात... येताना मनुष्य बंद मूठ करून या जगात येतो आणि जाताना तीच मूठ मात्र उघडी ठेवून जातो,,, काहीही घेऊन जाता येत नाही...

अशीच ही म्हातारी आजी आता मात्र भलतीच अशक्त झाली होती, काठी टेकत टेकत भिंतीला हात धरून चालणं सुरूच होत,,, अंतर मात्र आता कमी उरलं होत...

जेव्हा पण ती मला भेटायची तेव्ही तिची मी नेहमी चौकशी करायचो... त्यामुळे तिला सुद्धा माझ्याशी बोलायला आवडायचे. तिच्याच घरात ती एक नको असलेली व्यक्ती झालेली होती. कोणालाही तिची विशेष काळजी उरली नव्हती,,, त्यामुळे तिला कोणी विचारपूस केली की आवडायचे. लिफ्ट ने वरती परत घरी जाताना तिचा सुरुकुतलेला हात धरून तिला मी तिच्या माळ्यावर नेऊन सोडत असे, आणि मग मी माझ्या घरी परत जात असे... थ्यॅक्यु बेटा... गॉड ब्लेस यू!!! हे शब्द नेहमी तिच्या ओठातून बाहेर पडत असे... हळू हळू तिची शक्ती कमी होत गेली, तरी सुद्धा चालणं-फिरणं तिने सोडलं नव्हतं. आता तिचे बोलणे मात्र बदलले होते, कधी सहज बोलले विचारले की म्हणत असे,,, वो गॉड है ना... वो मेरी टेस्ट ले रहा है... कब पता नही वो मुझे ले जाना चाहता है? बिचारी कंटाळली होती स्वतःच्या जिवाला... वाट पाहण्याचे कष्ट सुद्धा घेणे त्या तिच्या शरीराला आता शक्य राहिले नव्हते.

हे ख्रिश्चन कुटुंब एकदा या म्हातार्‍या आजीला घरात एकटीच ठेवून (घरात बुहुधा तिला सांभाळणारी एक बाई ठेवली होती त्यावेळी... ) पिकनीकसाठी गोव्याला निघून गेले होते... आणि म्हातारीने प्राण सोडला!!!

तिच्याकडी भेटायला येणार्‍या काही नातेवाईकांना... ज्यांचं येणं-जाण होत... अशांना कळवले गेले. जे नातेवाईक घरी पोहचले त्यांनी व इतरांनीही फोन करून ह्या आजीच्या घरच्यांना कळवले की नाना ख्रिस्तवासी झालेली आहे... पिकनिकवर एन्जॉय करत असलेल्या तिच्या मुलाने फोनवर कळवले... तिला शवागारात नेऊन ठेवा!!! माणसाला काळीज नसणे म्हणजे काय याचा तंतोतंत नमुना म्हणजे हा प्राणी... हो प्राणीच!!!

त्यांनी त्यांची सुटटी साजरा केली आणि काही दिवसाने परत आले... म्हातारी बिचारी तो पर्यंत बर्फावरच... शेवटी अंत्यविधी झाला एकदाचा!!! थंडीसाठी दुसर्‍यांना स्वेटर विणणारी,,, स्वतः:मात्र बर्फावर पडून होती कित्येक दिवस...
*************************************************************************************


मदनबाण.....

विठू विठू !

त्या दिवशी मी बाहेरच्या खोलीत अभ्यासाला बसलो होतो...शाळेचा गृहपाठ करायचा जाम कंटाळा आला होता.तरीसुद्धा मांडीवर पुस्तक ठेवून वाचन चालूच होतं...आय एम अ गाईड बॉय...

तेव्हढ्यात मला एक सावली चालत येताना दिसली...पक्षाची होती ती. चिमणी असेल असं पहिल्यांदा वाटलं पण हळू हळू जेव्हा तो पक्षी चालत आला आणि मला दिसला,तो होता एक पोपट. स्वयंपाक गृहाच्या खिडकीतून तो आत आला होता. ते सुद्धा अगदी आरामात चालत चालत...आत्ता पर्यंत फक्त खिडकीत फक्त खारच येऊन जायची पण आता डायरेक्ट तोताराम प्रकट झाले होते. मी पटकन उडी मारली आणि त्याच्या जवळ गेलो...भाऊ वैतागला, लगेच डोक्यावरचे (त्याच्या ) केस उभे झाले होते आणि डोले लाल. त्याला हात लावणार तेव्हढ्यात त्याने त्याच्या चोचीने चावण्याचा प्रयत्न केला...थोडक्यात बोट वाचले. माझ्या लक्षात आले की याने आत्ता पर्यंत एकदाही उडण्याचा प्रयत्न केला नाही...याचा अर्थ बहुतेक पंखाला मार लागला असावा किंवा कोणी दुसर्‍या पक्षाने हल्ला केला असावा. त्याच्या शरीरावर कुठलीही जखम दिसत नव्हती,याचा अर्थ त्याचा पंखच दुखावला गेला होता असा अंदाज मी केला. पटकन आईला हाक मारली आणि तिला सुद्धा तो पोपटराम दाखवला...पोपटाने सुद्धा मातोश्रींना पाहिले,,,आणि तो चालत चालत तिच्याकडेच जाऊ लागला... ती घाबरली (आधी एकदा कुत्र्याचे पिलू कुठून तरी उचलून आणले होते तेव्हाही अशीच घाबरली होती). तिला वाटले आता हा चावतो की काय!!! पण त्याने तसे काहीच केले नाही.आता आई घरभर जिथे जाईल तिथे तिथे तिच्या मागे मागे चालत राहणे हेच त्या तोताराम चे काम झाले... वडील संध्याकाळी कामावरून आले आणि त्यांना ही सगळी तोताराम कथा सांगितली व त्या खोलीच्या कोपर्‍यात बसलेल्या पोपटाकडे बोट दाखवले. बाबांनी घरी येताना काही फळं आणली होती,त्यातलेच एक फळ त्याला खायला दे असे त्यांनी मला सांगितले...त्या प्रमाणेच मी केले आणि लांबूनच त्या फळाचे तुकडे त्याच्या जवळ सरकवले.

मेजवानी खातोय या थाटात त्याने ते मटकवले. मी बाबांकडे हट्ट करायला सुरुवात केली,,,मला हा पोपट आता पाळायचाच आहे !!! बाबा म्हणाले.. अजिबात नाही, उद्या-परवा पर्यंत तो स्वत:च उडून जाईल त्याला त्रास देऊ नको. बाबांचा पक्षी पाळण्यास विरोध होता कारण अशा प्रकारे आकाशात स्वच्छंद उडणार्‍या पक्षाला पिंजर्‍यात कोंडून ठेवणे त्यांना मान्य नव्हते. मी भरपूर हट्ट केला...गडबडा लादीवर लोळलो, पण त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. दुसरा दिवस उजाडला...तोताराम मस्त मजेत होते...त्याच्या साठी एका ताटलीत एक मस्त मिरची आणि एका छोट्या वाटीत पाणी पिण्यासाठी ठेवले आणि मी शाळेत निघून गेलो... शाळेत सुद्धा कधी एकदा परत घरी परत जातोय आणि त्या पोपटाशी बोलतोय असं झालं होत.

शाळेतून घरी आल्यावर आधी तोतारामची भेट घेतली...साहेब मजेत होते...आई म्हणाली,,, अरे सारखा मागे मागे फिरत असतो... स्वयंपाक घरात सुद्धा मागे उभा असतो...घाईत चुकून त्याच्यावर पाय पडला तर !!! तिला त्याला दुखापत होईल अशी भिती वाटत होती.आता काय करायचं... हा काही उडायला तयार नव्हता तेव्हा शेवटी त्याच्यासाठी पिंजरा आणायचा असे ठरले. बाबांनी मला आधीच सांगितले... तो बरा झाला ना की त्याला लगेच सोडून द्यायचे...या कबुलीवर त्यांनी पिंजरा आणण्याची तयारी दर्शवली होती. मी लगेच हो म्हणालो... मग बाबांनी त्याच्यासाठी मस्तपैकी एक छोटासा झुला असणारा पिंजरा घेऊन आले.

मला फार आनंद झाला. खिडकीत मधोमध असलेल्या एका हूक मध्ये त्याचा पिंजरा अडकवला देखील. आता येता जाता त्याच्याशी बोलणे हाच माझा छंद झाला होता. तोताराम शिट्या वाजवण्यात तरबेज निघाला. त्याच्या समोर मी एक शिटी वाजवली असता त्याने ५-६ वेगवेगळ्या शिट्या वाजवून दाखवल्या...मी चाटच पडलो...आई ज्या नावाने मला हाक मारायची त्याच नावाने तो सुद्धा आता हाक मारू लागला. शाळेतून घरी आल्यावर त्याच्याशी खेळणे हा आता नित्यक्रम झाला होता. तोताराम ची चैन चालली होती...मिरीची च्या बियाच त्याला जास्त आवडायच्या. दोन तीन दिवसांनी त्याला मस्त पैकी अंघोळ घातली.

तोतारामला आरसा दाखवला की त्याला कोणीतरी समोर दुसरा पक्षी आहे असे वाटून तो लगेच अनेक प्रकारे शिट्या वाजवून ’विठू, विठू’ असे जोरात ओरडतो, असे मला आता कळले होते. त्यामुळे कधी कंटाळा आला की मी लगेच आरसा त्याच्या समोर घेऊन जात असे. तो लगेच त्याची पोपटपंची चालू करत असे. पण अशा प्रकारे मी त्याच्या मनाशी खेळतोय याची एकदा मला अचानक जाणीव झाली आणि तसे करणे मी लगेच सोडून दिले.

आता बाबांनी सांगितले की बरेच दिवस झाले आहेत आपण त्याला सोडून येऊया. मी लगेच हट्ट करायला सुरुवात केली. मला तो जायला नको होता. बाबा म्हणाले तुला आधीच सांगितलं होत की याला आपण सोडून देणार आहोत. तरीही त्यांनी मला समजवले की जर मला त्यांनी एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यांच्या मनात येईल तेव्हाच मला खायला दिले...सतत तसेच कोंडून ठेवले तर तुला चालेल का ? मी म्हणालो नाही... मग बाबांबरोबर मी आमच्या बिल्डिंगच्या खाली एका झाडाजवळ गेलो...आणि तिथे पिंजरा उघडला...पण तोताराम बाहेर यायला तयार नव्हते...खूप पिंजरा हालवून सुद्धा तो उडाला नाही. बराच वेळ पिंजरा खाली ठेवला तरी तो काही उडाला नाही. शेवटी त्याला परत घरी आणला... जवळ पास एक आठवडा झाला असेल एकदा मी त्याचा पिंजरा घेतला आणि त्याचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला .... क्षणभर घरात उडाला आणि आभाळात मनसोक्त उडण्यास निघून गेला.....

तोताराम विशेष :--- एकदा मी बाबांशी बोलताना पटकन त्यांना उलट उत्तर दिले, तेव्हा त्यांनी माझ्या कानफटात ठेवून दिली होती आणि मी त्याबरोबरच रडायला सुरुवात केली तेव्हा या तोताराम ने माझ्या रडण्याच्या आवाजाची तंतोतंत नक्कल केली होती आणि तो आवाज ऐकून मी आणि बाबा चक्क हसायला लागलो. पितृपंधरवड्यात आलेला हा अनामिक पाहुणा माझ्या मनात कायमचे घर करून केला.

मदनबाण.....