11 August 2009

माझी धडपड... भाग ८

युजर:---अरे यार तुमने तो मेरेको आज बचा लिया....तुम्हारा शुक्रिया अदा कैसे करू यह मुझे समझ नही आ रहा है।...
तो खरंच खूप खूश झाला होता...आणि मी सुद्धा...कोणाच्या तरी प्रॉब्लेम वेळेवर सोडवू शकलो याचाच जास्त आनंद वाटला.

आता निकाल फक्त माझ्या बॉसचाच लावायचा होता...

**************************************************************************

अशाच वेगवेगळ्या केसेस रोज येत होत्या आणि आम्ही त्या सोडवत होतो...अशाच एका दुपारी माझ्या बॉस ने मला एक काम सांगितले,तो म्हणाला ७ बंगला येथील एका ब्रांच मध्ये एक स्विच बंद पडला आहे तो बदलून ये.मी या आधी कधीच अशा प्रकारचे काम केले नव्हते त्यामुळे मी जरासा विचारात पडलो...तेव्हढ्यात माझ्या बॉसने एक भला मोठा स्विच मला दिला आणि म्हणाला चल निघ आता...
त्यावेळी माझ्या पाकिटात ऑफिस ते घर येण्याजाण्याला लागतील तेव्हढेच पैसे किंवा त्यापेक्षा थोडेसेच अधिक पैसे असत...त्यामुळे मी बॉसकडे थोडे पैसे मागितले व ते नंतर क्लेम करून घ्या असे सांगितले (बॉस ट्रॅव्हल अमाउंट क्लेम करू शकत होता).त्याने लगेच किरकिर केली आणि फक्त १०० रु. माझ्या हातात टेकवले.मी विचारले टॅक्सीला एव्हढे पैसे पुरणार नाहीत...टॅक्सीने कशाला जायला हवे ?बसने जा !!!
आता एव्हढा मोठा स्विच मी बसमधल्या एवढ्या गर्दीतून कसा नेणार??? पण दुसरा पर्याय नव्हता...मी तो स्विच उचलला आणि निघालो...बस स्टॉपवर उभ्या असलेल्या काही लोकांना विचारले ७ बंगला ला जाणारी बस कुठली आहे?तिथे उभे असणार्‍यांपैकी एकाने मला कुठल्या नंबरची बस धरायची ते सांगितले.
शेवटी एकदा बस मिळाली,त्या गर्दीत कसा बसा तो जड स्विच हातात धरून प्रवास सुरू केला आणि काही वेळाने जिथे मला उतरायचे होते त्या स्टॉपला उतरलो...जवळच असलेल्या दुकानात बॅकेच्या बद्दल विचारणा केली असता त्या बॅकेची ब्रांच कुठे आहे ते कळले...पायी पायी चालून शेवटी त्या स्थळी मी एकदाचा पोहचलो.
बॅकेच्या ब्रांच मध्ये शिरलो, आत पाहतो तर जास्त गर्दी नव्हती बहुधा हाफ-डे असल्यामुळे बरेच कर्मचारी निघून गेलेले होते.मग एकाला धरले आणि मी कशासाठी आलो आहे ते सांगितले,त्याने मला बॅंकेचा डक्ट दाखवला तिथेच त्यांचे स्विच आणि दुसरी उपकरणे बसवलेली होती.जो स्विच मला बदलायचा होता तो आधी शोधला,तो बंद झाल्यामुळे बँकेच्या ब्रांचला लागूनच असलेले एटीएम मशीन बंद झाले होते.
जो स्विच बदलायचा होता तो रॅकवर व्यवस्थित बसवलेला होता व त्याच्या सर्व वायर्स घट्ट बांधलेल्या होत्या पण माझ्या उंची पेक्षा खूप उंच अंतरावर तो बसवलेला होता त्यामुळे माझा हात नीट तिथ पर्यंत पोहचत नव्हता !!!ब्रांच मध्ये एखादे छोटेसे स्टूल आहे का विचारले ज्यावर चढून मी तो स्विच बदलण्याचा विचार करत होतो...पण काहीही मिळाले नाही शेवटी बॉसला फोन करावा असा विचार केला.
बॉसला फोन लावला आणि त्या बंद पडलेल्या स्विच पर्यंत माझा हात पोहचत नाही असे सांगितले आणि तिथ पर्यंत चढून जायला इथे दुसरं काहीच नाही हे देखील सांगितले...
बॉस :--- अरे स्टूल काय फोन मधून देऊ मी तुला,मला काही माहीत नाही तो स्विच बदलूनच ये !!!
त्याने रागा रागाने फोन ठेवून दिला...मी जाम वैतागलो धड नीट बोलत पण नाही म्हणजे काय!!!
बँकेच्या बाजूला असलेले एटीएम मशीन होते तिथे गेलो आणि वॉचमनला सांगितले मेरे साथ आओ...तो वॉचमन भैय्या होता.(एक जमाना होता की वॉचमन मंडळी मेड इन नेपाळ होती आज ती मेड इन युपी वालीच असतात !!!)त्या वॉचमनला घेऊन ब्रांच मध्ये शिरलो आणि एक व्हील चेयर घेऊन डक्ट मध्ये शिरलो...त्या हलणार्‍या व्हील चेयर वर मी उभा राहिलो,त्या वॉचमनला सांगितले की चेयर नीट घट्ट धरून ठेव नाहीतर मी खाली पडायचो,एव्हढं करून सुद्धा माझा हात नीटसा पोहचत नव्हता...शेवटी चेयरवर आपण जिथं हात ठेवतो तिथे पाय ठेवला आणि त्या बंद स्विच वर नवीन आणलेला स्विच ठेवला,जुन्या स्विच मधल्या पोर्ट वरील एक एक वायर मी काढायला सुरुवात केली आणि ती नव्या स्विच मधल्या त्याच नंबरच्या पोर्ट मध्ये बसवली आणि स्विचच्या मागे हात घालून पावर कॉर्ड सुद्धा बसवली व तो स्विच चालू केला.
एटीएम मशीन अप झाले आणि माझे काम संपले,माझ्याकडे जुना स्विच काढायची कुठलीच व्यवस्था नसल्याने तो तिथेच सोडून मी त्या दिवशीचे काम संपवले.
दुसर्‍या दिवशी जेव्हा कामावर आलो तेव्ह्या माझा बॉस माझ्यावर जाम उखडला...तो म्हणाला जुना स्विच का आणला नाहीस ? मी सांगितले साधा स्क्रू-ड्रायव्हर सुद्धा न देता तुम्ही मला पाठवले त्याही परिस्थितीत मी तो स्विच कसा बसा चालू करून आलो आहे.पण हा भाऊ काही पण ऐकालाच तयार नव्हता...मी माझ्ह्या रोजच्या कामाला सुरुवात केली तरी ह्याची टँवटँव काही बंद होईना...तू आत्ता काय करतो आहेस ? शेवटी माझं टाळकं सटकलं...मी काही इथं भजन करत बसलेलो नाही,माझं रोजचंच काम करत आहे,दिसत नाही का तुम्हाला ???मग माझ्या बॉस ने माझे फार प्रमाने कौतुक केले आणि मी त्याचा उद्धार !!!! बरीच खडाजंगी झाल्यावर मी ठरवले की या साईटवर आता काम करायचे नाही.
दुसर्‍या दिवशी आमच्या हेड ऑफिसामध्ये जाऊन मी हंगामा केला आणि माझी साईट लोकेशन बदलावी अशी मागणी केली.
माझी मागणी मान्य झाली आणि मला नवीन साईट मिळाली.हिंदुस्थानातील मोबाईल क्षेत्रातील एक नामांकित कंपनी,तिथे काम करायची संधी मिळणार म्हणून मलाही आनंद झाल,साईट लोकेशन होते कल्याण.
आता रोज ठाणे-कल्याण असा प्रवास सुरू झाला...माझ्या ह्या नवीन ठिकाणी एक इंजि आधीच होता आणि त्याच्या कडूनंच मला सर्व काम शिकायचे होते,पण पहिल्या काही दिवसातच मला त्याचा अस्वस्थपणा जाणवला.मी तिथे आल्यामुळे त्याला हाकलतील अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती.(अर्थात असे काही होणार नव्हते...)त्यामुळे तो विविध लोकेशनला जाताना मला घेऊन जात नसे...त्यामुळे ऑफिसात नुसता बसून असे,सकाळी ९ ते संध्याकाळी ५ नुसते इंटरनेट सर्फ करणे हाच उध्योग,ज्याचा मला फार कंटाळा आला होता.हळूहळू त्या दुसर्‍या इंजि.च्या मनातली ती भावना कमी झाली आणि माझी वेगवेगळ्या साईट वर भटकंती सुरू झाली...
या मोबाईल कंपनीचे विविध ठिकाणी इंटरनेट कॅफेज होते त्यामुळे जिथे कॅफे असेल तिथे तिथे जाणे क्रमप्राप्त होते.जरी माझे साईट लोकेशन कल्याण असले तरी बर्‍याच वेगवेगळ्या ठिकाणी मला जावे लागे.कधी अंबरनाथ तर कधी उल्हासनगर तर कधी डोंबिवली...सतत भटकंती.
भटकंती केल्यामुळे विविध गोष्टी शिकायला मिळाल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांशी संपर्क सुद्धा झाला,काही खडूस तर काही चांगली, काही लबाड तर काही दयाळू.
या ठिकाणी सुद्धा मला बर्‍याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या...काही नेटवर्क मधल्या तर काही हार्डवेयर मधल्या.सर्वात मला आवडलेला प्रकार म्हणजे नॉर्टन घोष्ट (http://en.wikipedia.org/wiki/Ghost_(software),http://www.symantec.com/norton/ghos, )
हा प्रकार आम्हाला बर्‍याच वेळी करायला लागायचा पण त्यामुळे बराचसा वेळ वाचायचा देखील...काही तरी नवीन करतोय याचाच जास्त आनंद मला झाला होता.
पण मला माझा सहकारी जसा वाटला होता त्यापेक्षा तो जरा निराळाच होता...

मदनबाण.....
क्रमशः

01 August 2009

माझी धडपड... भाग ७

हे ध्यान एक नंबरच यडबंबु होत...सारखा कोणाला तरी फोन करायचा आणि आजचा हा असा अपडेट आहे असे काहीसा पुटपुटायचा...आम्ही सर्व म्हणायचो सुकटीच्याला काय पण माहीत नाय पण लय उडतो आकाशात....
या सोंड्याची आणि माझी लवकरच जुगलबंदी होणार होती...
***************************************************************************

रोज नव-नवीन अनुभव येत होते,आणि बरंच काही शिकायला सुद्धा मिळत होते.फोन वाजला की समोरच्या युजरचा प्रॉब्लेम ऐकून तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा.
आता सगळी जवाबदारी आमच्या टीमवर होती कारण आधीची टीम आम्हाला टाटा-बाय बाय करून निघून गेली होती ते ही धड कुठलाही व्यवस्थित हॅन्डओव्हर न देता...
व्यवस्थित हॅन्डओव्हर न मिळाल्यामुळे पहिले काही दिवस जाम त्रासात गेले,,,सतत कानाला फोन लावून ठेवल्याने फोन आणि कान गरम व्हायचे.दिवसभरात मी किती फोन कॉल घेत असे याचा तर पत्ताच नव्हता कारण एक कॉल उचलला आणि काम संपल्यावर रिसीव्हरवर परत ठेवला की लगेच दुसरा कॉल येई आणि काम परत चालू...अक्षरशः: मी फोन उचलणारा रोबोच झालो आहे असे मला वाटायला लागले होते.मी शिकलेले सर्व सॊफ़्टवेअर इस्स्टॉलेशनचे सर्व डॉक्युमेंन्ट मी बनवले आणि आमच्या टीमच्या सर्व मुलांच्या कॉम्प्युटरवर स्टोअर करून ठेवले म्हणजे प्रत्येक जण ते वाचून काम करू शकेल.आमच्या टीममधील त्या मद्रासण मुलीला आम्ही सोपे काम वाटून दिले,तिला जे जमेल आणि झेपेल अशाच गोष्टी आम्ही तिला शिकवल्या,,,तिला शक्यतो हार्डवेअर कॉल वर आम्ही पाठवत नसू कारण त्या कॉलमधे बर्‍याच वेळा सीपीयू(केबिनेट) उचला, मॊनिटर उचला असली हमाली करावी लागे.
बर्‍याच वेळी तर काहीही चूक नसताना युजरर्स कडून बोलणी खावी लागायची...काही लोकांना जाम माज असतो त्यांच्या पोस्टचा...मिळणार्‍या पगाराचा...आणि तो माज बर्‍याच वेळी आमच्या सारख्या इंजि ला सहन करावा लागे...काय वाटेल ते बोलायचे आपण मात्र गप गुमान ऐकायचे आपले काम करायचे आणि दुसर्या कॉल वर निघून जायचे...पण हळू हळू अशा अतिशाहाण्यांना कसे वठणीवर आणायचे याचे तंत्रच आम्ही विकसीत केले.
जो युजर जास्त माज करतो त्याच्या कॉलला सर्वात शेवटी अटेंड करायचा आणि त्यांनी जास्त आरडा-ओरडा केला तर सरळ सांगायचो आधीचे काम पूर्ण झाल्याशिवाय तुझा कॉलला हातच लावणार नाही...(मनात :---काय घंटा उखाडणार आहेस तू माझे??? बस बोंबलत...आईच्चा घो तुझ्या...)
काय आहे की अशा वेळी माजुरडा युजर काहीतरी महत्त्वाच्या कामात अडकलेला असतो त्यातच त्याचा बॉस त्याला काम लवकर म्हणून मागे लागलेला असतो त्यामुळे त्याचे बिघडलेले काम आमच्या शिवाय कोणच करून देणार नसते मग ते प्रिंटर कॉन्फ़्युग्रेशन असो वा ओएस क्रॅश...मग असे युजर सुतासारखे सरळ येण्यास सुरुवात झाली.
ब्रेक टाइम मध्ये आम्ही बर्याच गोष्टींवर बोलायचो...आमच्या बॅचच्या पण इतर साईटवर असणार्या मित्रांशी त्याच्या अनुभवा बद्दल विचारायचो...एक दिवस असाच माझ्या एका मित्राचा फोन आला.हा पोरगा नॉर्थवाला शिक्षण बी.इ टेलि-कम्युनिकेशन.त्याने एकदिवस काम करताना काही तरी चूक केली म्हणून त्याचा बॉस त्याच्यावर जाम उखडला आणि त्याला फुल टाइम हार्डडिस्क फॉरमॅट करणे आणि ओएस इन्स्टॉल करणे हे काम दिले...बिचारा दिवसाला कमीत कमी ७ ते ८ हार्ड डिस्क तरी फॉरमॅट करायचाच...मला फोनवर म्हणाला...अरे यार रात को सपने मै भी मेरेको पार्टीशन का साईज कर रहा हु असा लगता है...हा मेमरी चा उच्चार नेहमी मेमोरी असा करायचा पण आता ह्याचीच मेमोरी रिड ओन्ली झाली होती.
हल्ली रोज मला एकाच बाईचा फोन कुठल्या ना कुठल्या कारणासाठी येत होता..आज परत तिचा फोन आला...तिचा मादक हॅलो ऐकूनच मला कळले की आज अजून कुठली तरी नवीन भानगड घेऊन आली आहे...
तिला विचारले काय प्रॊब्लेम आहे ती म्हणाली काहीही सेव्ह करता येत नाही!!!
मी :--- म्हणजे नक्की काय होतंय?...
ती :--- कुठलीही फाइल सेव्ह करायला गेलं की एरर येतो...
मी तिच्या कॊप्युटरचा रिमोट घेतला आणि ती नक्की काय करताना एरर येतो ते पाहिले आणि मग हार्डडिस्कची साइज पाहिली...ती होती १ जिबी.
च्यायला हा कुठला बाबा आदमच्या जमान्यातला संगणक जमवून बसलीय असं वाटलं...थोड्या फालतू फाइल डिलीट मारल्या (कुठल्याही कंपनीत युजरच्या हार्डडिस्क मध्ये काय सापडेल याचा नेम नाही...एमपीथ्री गाणी ,मूव्हीज,सॉफ़्टवेयर,,कुठल्यातरी १० ठिकाणी फिरून येणार्या मेल मधील पीपीटी...पॉर्न मूव्हीज (याचा साठा तर जिबी मध्ये आढळतो.. )तर त्या बयेला मी सांगितले की तुझ्या बॉसला सांगा की तुला अपग्रेड हवाय म्हणजे तुझ्या पिसीला अपग्रेड हवाय.
कॉल फ्रॉम कोलकाता माझ्या मित्राने मला खुणावले...आणि माझ्या लक्षात आले की हा तर तोच बंगाली मॅनेजर आहे ज्याचे आधी काही प्रॉब्लेम मी सोडवले होते आणि आता त्याला मीच फोन वर हवा होतो...मी मित्राला सांगितले की त्याची केस तूच हॅन्डल कर पण तो बंगाल्या काही केल्या ऐकेनाच... त्याला मीच हवा ( गैरसमज नसावा आय एम सरळ) Smile तर शेवटी त्याच्याशी बोललो...तोंडात रसगुल्ला पकडूनच बोलत आहे असा त्याचा आवाज..आणि अधून मधून प्रश्न, की बोलची?भालो...एट्टो.. ए पागोल है कै क्या तुम ? (हे वाक्य फार प्रेमाने बोलतात) शेवटी या गोलगप्याचा प्रश्न मी सोडवला त्याला हवे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आणि मी सुटलो एकदाचा...
आज १५ ऒगस्ट खरं तर आम्हाला सुट्टी ध्यायला हवी कारण सर्व बॅंकांना सुट्टी होती त्यामुळे काहीच काम नव्हते,पण आमचा ह्या सोंड्या बॉस ने आदल्या रात्री ११:३० ला फोन केला आणि आदेश दिला कामावर या असा!!! हा मोबाईल मी पाण्याच्या बादलीत का नाही बुडवून टाकला अजून असा मनात विचार केला !!!
जितक्या जमतील आणि आठवतील तितक्या शिव्या होलसेलच्या भावाने माझ्या बॉसला अर्पण केल्या पण मनातल्या मनात.
शेवटी अख्खा दिवस ऒफ़िसात एकट्यानेच बसून काढला कारण फक्त मलाच त्याने बोलवले होते...अख्ख्या दिवसात फक्त एकच कॊल आला आणि तो देखिल रॊग नंबर...
दिवसेन दिवस हा बॉस नावाचा प्राणी एखाध्या मोहरी चढलेल्या लोणच्या प्रमाणे डोक्यात जात होता...सौजन्य ने कसे बोलावे ते तर सोडाच पण सौजन्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नसावा...सतत अरेरावी...कुठून झक मारली आणि या साईटवर आलो असे झाले होते...पण काय करणार!!!आलिया.... .... सादर.
वेगवेगळ्या प्रकारचे कॉल हॅन्डल करताना मजा येत होती...कुठलातरी विचित्र प्रॊब्लेम सॉल्व्ह केला की अजून मजा यायची...बरं पण यासाठी कुठलाही डेटाबेस आमच्या कडे नव्हता...स्वतः:च टाळकं वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हाच एकमात्र पर्याय.असेच दोन वेगवेगळे कॉल एकाच दिवशी माझ्याकडे आले.
कॊल १ :--- युजर :-- हॅलो..माझी स्क्रीन उलटी झाली आहे काय करू?
मी (मनात) मॉनिटर उलटा ठेवून काम कर मग...
मी :--- हा पण अशी स्क्रीन एकदम उलटी कशी झाली अचानक??तुम्ही काय करत होतात नक्की?
युजर :-- काही पण नाही हो...पण प्लीज बघा ना कशी सरळ स्क्रीन होईल ते...
मी :-- ह्म्म...आयपी सांगा तुमचा... हा आता मी रिमोट घेतो आहे तुमच्या कॊप्युटरचा...
आता अशा प्रॉब्लेम मध्ये जिथे स्क्रीन उलटी झालेली असते त्याचा रिमोट घेतला असता तुम्हाला मात्र ती सरळच दिसते...मात्र युजरच्या इथं मात्र ती खरंच उलटी किंवा आडवी असते.विंडोज मध्ये कंट्रोल अल्ट आणि अ‍ॅरो की दाबल्या की मॉनिटरची स्क्रीन बर्‍याच वेळा फिरते हेच नेमकं त्यावेळी झालं होतं आणि आम्हाला हे रोजच्या कामाच्या आरएनडी मधून कळलं होतं...
मी :--- हा आता बघा स्क्रीन हालली का ???
युजर :--- हा थोडी उजवी कडे अजून पूर्णं झाली नाही.
मी :--- आता...
युजर :--- आता एकदम बरोबर...स्क्रीन बरोबर झाली.
समोरच्याला जे दिसतं असतं ते आपल्याला रिमोट घेतल्या नंतर अशा वेळी कळत नाही की नक्की कुठली अ‍ॅरो की दाबायची...त्यामुळे त्याला फोनवर विचारत विचारतच काम करावे लागते.(असेच काही दिवसापूर्वी लंडनमध्यल्या एका पिसीचे झाले होते आणि इथं मुंबईत बसून त्याची ३६० अंशाने फिरलेली स्क्रीन मी इथे भारतात बसून सरळ केली. तापर्य :--- अनुभव कधीच वाया जात नाही
कॉल २ :--- बंजारा हिल्स हैदराबाद.
युजर ( बॅकेचा ब्रांच मॅनेजर ) :--- माझी विंडोज लॉक झाली आहे काहीही करून मला मदत करा कारण काल रात्रभर बसून मी या पिसीवर काम केले आहे आणि सर्व महत्त्वाचा डेटा मला आज सबमिट करायचा आहे (काहीतरी वेगळाच शब्द वापरला त्याने आता आठवत नाही)मी जर तसे नाही केले तर १.५ कोटीचा फटका बसेल!!!
आता या केस मध्ये पहिल्यांदा असे वाटेल की विंडोज लॉक झाली आहे म्हणजे पासवर्ड चुकीचा टाकल्यामुळे लॉक झाला असेल पण तसं नव्हते त्याची विंडोज एक्सपीची ओएस लॉक झाली होती आणि बहुधा त्याचे रजिस्ट्रेशन नीट न झाल्यामुळे बहुधा ही स्थिती उद्भवली होती,अशा वेळी त्या पिसीचा रिमोट घेणे शक्य होत नाही.
मी:--- तुम्हाला स्क्रीनवर काय दिसते?
युजर :-- अमुक तमुक आणि नेक्स्ट...
मी :--(अंदाजपंछी) हा नेक्स्टवर क्लिक करा...आता काय दिसते ते सांगा...
युजर:--- हा आता काही तरी कोड दिसतो आहे आणि फोन नंबर दिसतो आहे...आणि अजून कुठला तरी कोड विचारत आहे.
मी:-- तो कोड आणि फोन नंबर ध्या...(३२ डिजीट कोड व फोन नंबर)
मी तो फोन नंबर फिरवला तो कुठेतरी मायक्रोसॊफ़्ट दिल्लीला लागला,,,त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला व माझ्याकडचा ३२ डिजीटचा कोड त्यांना दिला आता ते अगदी वेगळा कोड मला(३२ डिजीटचाच)देणार होते जो टाकल्या नंतर विंडोज एक्सपी अनलॉक होणार होते...
हैदराबाद-दिल्ली-हैदराबाद अशी बरीचशी फ़ोना फ़ोनी करून शेवटी एकदाचा त्या युजरचा प्रॉब्लेम सुटला...
युजर:---अरे यार तुमने तो मेरेको आज बचा लिया....तुम्हारा शुक्रिया अदा कैसे करु यह मुझे समझ नही आ रहा है।...
तो खरंच खूप खूश झाला होता...आणि मी सुद्धा...कोणाच्या तरी प्रॉब्लेम वेळेवर सोडवू शकलो याचाच जास्त आनंद वाटला.
आता निकाल फक्त माझ्या बॉसचाच लावायचा होता...

मदनबाण.....
क्रमशः