18 July 2009

माझी धडपड... भाग ६

माझ्या थापे मुळे वेळ तर निभावून नेली होती पण, उगाच खोटे बोलावे लागले म्हणून जरा वाईट देखील वाटलं, धड काही माहीत असत तर निदान नीट मदत तरी करता आली असती असा मनात विचार येऊन गेला.शेवटी एकदाचा पहिला दिवस संपला तर!!!
दुसरा दिवस अजून गमतीशीर जाणार होता...
*****************************************************************

दुसरा दिवस उजाडला आणि येताना नवीन भानगड सोबत घेऊन आला.त्या दिवशी सकाळी जरा लवकरच ऑफिसला आलो होतो,अजून कुठलाही कॉल लॉग झाला नव्हता त्यामुळे जरा निवांतच बसलो होतो.माझे इतर सहकारी मित्र काही वेळातच आले आणि आम्ही प्रत्येकाने आदल्या दिवशी केलेल्या कॉल विषयी गप्पा मारू लागलो,प्रत्येक जण आपापले अनुभव सांगत होता,,,प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते.तेव्हढ्यात डेस्क वरचा एक फोन वाजला आणि त्याचं बरोबर बाकीचे फोनही वाजण्यास सुरू झाले.
आम्ही फोन घेतले असता आम्हाला कळले की बॅकेच्या शाखेत काही तरी गडबड झाली आहे आणि त्याचा त्यांच्या कामावर परिणाम झाला आहे.प्रत्येक कॉल हा त्यासाठीच येत होता,आम्ही सगळे लगेच निघालो आणि त्या बॅकेच्या शाखेत गेलो...बॅक सुरू होऊन बराच वेळ झाला होता पण कोणीही काम करत नव्हते.प्रत्येक जण आम्हाला आमची ही साईट ओपन होत नाही,आमची फिनॅकलची लिंक चालत नाही...इ.अनेक तक्रारी करू लागला.या सर्व गडबडीमुळे बॅकेचे काम संपूर्णपणे थांबले होते.आम्ही या कारणांचा शोध घ्यायला सुरुवात केली पण काही केल्या याचा शोध लागेनाच,तेव्हढ्यातच आमच्या पैकी एक जण बातमी घेऊन आला...आमच्या सीनियर इंजि ने काल रात्री नेटवर्क मध्ये काही चेंज केले होते आणि हे सर्व त्याचेच फळ होते.
आम्ही फोनाफोनी करून नक्की आम्ही काय काय करू शकतो याची माहिती मिळवली आणि ती नीट लिहून घेतली.लिहून घेतलेल्या माहित्याच्या आधारावर आमचे काम आम्ही सुरू केले.इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये असलेली काही सेटींग्स बदलून बरेचश्या साईट्स आता उघडू लागल्या होत्या,तेवढ्यात एका स्त्रीचा आवाज आला...अरे ए इकडे ये माझ्या मशीनचा सुद्धा प्रॉब्लेम आहे.
मी वळून पाहिले तर ती बाई आमच्या (माझ्या घरच्यांच्या) परिचयातली होती,मी त्यांना ओळखले आणि त्यांनी मला.त्यांनी मला विचारले अरे तू इथे काय करतो आहेस? मला थोडे ओशाळल्या सारखे वाटले आणि थोडी लाजही,कारण मी अशा प्रकारचे काम करताना दिसेन असं त्यांना वाटलं नव्हतं हे त्यांच्या चेहेर्‍यावरील भाव पाहून स्पष्ट होत होतं.त्यांना थोडक्यात मी इथे कशासाठी काम करतोय ते सांगितलं आणि पटकन तिथून कलटी मारली.माझ्या डेस्कवर मी आलो पण माझ्या डोक्यातून हा विचार काही गेला नव्हता,त्या तिथल्या अनेक युजर पैकी एक होत्या आणि मी एक साधासा हार्डवेअर इंजि.आपण सुद्धा असे युजर बनायला हवे हा विचार त्याक्षणी माझ्या मनात पक्का झाला.
आजच्या नेटवर्कच्या झोलमुळे बॅकेचे बरेच काम खोळंबून राहिले होते,मी आणि माझ्या काही सहकार्‍यांनी ठरवले की आमच्या मेनं ऑफिसामध्ये जाऊन सांगायचे की या साईटवर दुसरे इंजि ठेवा आणि आम्हाला दुसर्‍या साईटवर टाका.लवकरच आमची त्या बॅकेच्या सीप्झ येथील शाखेत रवानगी झाली.या शाखेच्या पहिल्या मजल्यावर आमची हेल्पडेस्क रूम होती,माझ्या बरोबर इतर ब्रांच मधून सिलेक्ट झालेली माझ्याच क्लासमधली काही मुले होती.पहिल्या दिवशी आम्ही दिवसभर बसून होतो कारण त्या ऑफिस मध्ये आम्ही जे काम करणार होतो ते काम करणारी मंडळी एका वेगळ्याच एजन्सी मधली होती,त्यांचे या बॅकेसोबत झालेले कॉन्ट्रॅक्ट टरमिनेट झाले होते,आमच्या भाषेत त्यांच्या XXवर लाथ मारण्यात आली होती!!!.आम्हाला त्याच्याकडून हॅडओव्हर घ्यायचा होता तोही १ आठवड्यात.आता ही मंडळींना आम्हाला काहीही सांगण्यात इंटरेस्ट नव्हता,त्यामुळे ते काही विचारले तरी बर्‍याच वेळा सरळ सांगत नसत.(असाच अनुभव मला पुढेही येणार होता) या टीम मध्ये एक बाई होती बहुधा ती त्या टीमची हेड असावी, आम्ही जरा काही त्या इंजि विचारले की ह्या बाईची जोरजोरात वायफळ बडबड सुरू व्ह्यायची,काहीतरी फालतू जोक सांगून हसायची काय आणि काय...कसबसं झेललं आम्ही तिला ( म्हणजे तिला सहन केलं हो....:) ) या टीम मध्ये एक मल्लु इंजि होता,तो मात्र खरंच स्वभावाने चांगला होता...त्याच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि त्यानेच मला आता वेगवेगळी बॅंकेला लागणारी सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करण्यास शिकवायला सुरुवात केली.एका दिवसात बहुधा मी जवळपास २० ते २५ वेगवेगळी सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करणे शिकलो,काही सॉफ्टवेअर मध्ये तर डेटाबेस मॅप करण्याची भानगड वगैरे होती पण तेही मी माझ्या टाळक्यात नीट बसवून घेतलं.आता
मी एक पर्फेक्ट हेल्प डेस्क गाय... सॉरी बैल झालो होतो,तसेच आमच्या टीम बरोबर एक गरीब गाय पण होती ... ती म्हणजे एक साऊथ इंडियन मुलगी.तसं बघाल तर मुली या हार्डवेयर-नेटवर्किंगच्या साइडला जास्त येत नाहीत,त्या मोस्टली सॉफ्टवेयर साइडलाच जास्त असतात...(कॉलजचे दिवस आठवले...कॉम्प्युटर इंजि ला दिसणारी सुबक बांध्याची आणि मुक्तपणे विहार करणारी पाखरं...हा चला पुढं आता...)ही मॅरिड होती (कोण बोललं रे मनातल्या मनात पत्ता कट म्हणून ???)...हा तर तशी ती वयाने फारच लहान होती...म्हणजे तिला पाहून आमच्या पैकी कोणालाच वाटलं नव्हत की तिच लग्न झालेले असेल म्हणून, पण गळ्यात लटकणार लायसन्स दिसलं आणि आम्हाला कळलं ही एव्हढीशी दिसणारी मद्रासण लग्न झालेली आहे म्हणून.तिला प्रचंड टेन्शन आले होते आणि त्यामुळेच ती बरचशी डिप्रेस्ड दिसत होती...बहुधा आपल्याला हे काम कसं झेपेल हा विचार तिच्या मनात आला असावा...तिचा असा चेहरा पाहून मला राहवेना म्हणून मी तिला विचारले काय झाल ? त्या वेळी ब्रेक टाइम होत्या त्यामुळे आमच्या टीम शिवाय इतर कोणीच त्या ऑफिसामध्ये नव्हते...बाकीचे लोक चहा कॉफी पिण्यासाठी निघून गेले होते...काय झाल अस तिला विचारताच तिच्या डोळ्यातून चटकन पाणी तरळलं..आणि क्षणातच ती रडायला लागली !!! आयला आता हिला आवरायचं तरी कसं??? रडणार्‍या पोरींना आवरायला गेलं तर त्या अजूनच का रडतात हा मला न सुटलेला प्रश्न आहे.बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला पण तिच रडणं काही थांबेना, तेव्हढ्यात माझ्या डोक्यात विचार आला,मी तिला विचारले की तुझी आई कुठे असते ? तिचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे ??? हो म्हणाली, हिची माय साऊथ मध्ये होती,,,फोन लावला तिला आणि या अय्य्यो अय्यो ला दिले तिच्या तावडीत....आंदुड गुंदुड काही तरी चालू होते आणि अधून मधून अय्यो चा जयघोष !!! शेवटी तिच्या गंगा-यमुना थांबल्या आणि ती जरा नॉर्मल झाली.
आम्ही सर्वांनी तिला समजावली आणि सांगितले की तू काही काळजी करू नकोस म्हणून....माझ्या टीम पैकी मलाच आत्ता समजले होते की या साईटवर नेमक्या काय घडामोडी चालतात ते...६ कॉम्प्युटर आणि ४ आयपी फोन,काही सॉफ्टवेयरच्या सीडीज आणि काही डॉक्युमेंट असा तिथला पसारा होता.
मी जमेल तसे त्या जुन्या टीम कडूनं माहिती मिळवण्यास सुरुवात केली,नाखुशीने का होईना पण त्यांनी आता आम्हा सर्वांना तिथल्या कामाचे स्वरूप समजवून सांगण्यास सुरुवात केली.तरी त्या चोमड्या बाईचे उपद्व्याप काही केल्या संपत नव्हते...उगाच मध्ये मध्ये किडा-कांडी करत राहायची...फार पिडलं आम्हा पोरांना तिने...एक नंबरची डँबिस बाई होती ती.
आमचा या साईटचा बॉस...याच्या विषयी सांगायचंच राहिलं की....
माठ्या....एक नंबरचा माठ.अहो पाण्याचा माठ निदान पाणी थंड करण्याच्या कामी तरी येतो पण हा माठ म्हणजे एकदम निरोपयोगी बघा...पहिल्या दिवसापासून याची विनाकारण टिवटिव...अहो पिंजर्‍यातला पोपटसुद्धा काही वेळ ओरडून नंतर गप्प बसतो पण हे ध्यान तिच्यायला गप्प होण्याच नाव घेईल तर शपथ !!!फुकटची फालतू विचारणा करत बसे,ह्यायु केलं का ? आणि त्यायु केलं का ? त्याच्या फालतू प्रश्नावरूनच या माणसाला काडीचे टेक्नीकल नॉलेज नाही हे आम्हा सर्वांना कळून चुकले होते.
साला फुकटीची बॉसगीरी करत बसायचा आणि परत परत अधून मधून तेच तेच प्रश्न विचारून जाम पिडायचा...आमच्या पेक्षा त्याचीच जास्त फाटली होती...सारखा आपला रुमालाने घाम पुसत बसायचा तेही अशा रूम मध्ये जिथे आमच्यावर एसीच्या गारव्यामुळे नॉर्मल दिवसातही स्वेटर घालून बसायची वेळ आली होती.
हे ध्यान एक नंबरच यडबंबु होत...सारखा कोणाला तरी फोन करायचा आणि आजचा हा असा अपडेट आहे असे काहीसा पुटपुटायचा...आम्ही सर्व म्हणायचो सुकटीच्याला काय पण माहीत नाय पण लय उडतो आकाशात....
या सोंड्याची आणि माझी लवकरच जुगलबंदी होणार होती...

क्रमशः
मदनबाण.....

11 July 2009

माझी धडपड... भाग ५

माझा विचार सांगितला,त्यांनी फक्त मला विचारले तुला करायचे आहे ना नक्की ? माझे उत्तर होते :-- हो.
कंपनीत परमनंट होण्याचे लेटर मिळण्याच्या एक अठवड्या आधीच मी माझा राजीनामा दिला...

*************************************************************

मी राजीनामा माझ्या बॉसच्या टेबलावर ठेवला, त्याने विचारले काय आहे हे ? मी म्हणालो राजीनामा आहे माझा.
काय ? हे घे परत...मी लिहिलेले ते राजीनाम्याचे पत्र त्यांनी परत जबरदस्तीने माझ्या हातात कोंबले.मी त्यांना सांगिले की मला एक कोर्स करायचा आहे,आणि त्यासाठीच मी राजीनामा देत आहे.
तू तुला हव्या त्या वेळी ये आणि हव्या त्या वेळी जा पण ही नोकरी सोडू नकोस...असे त्यावेळी मला माझ्या बॉसने सांगितले.पण माझा हा कोर्स फुल टाइम आहे व त्यामुळे मी नोकरी व कोर्स एकाच वेळी एकत्रपणे करू शकणार नाही असे त्यांना मी सांगितले.ठीक आहे मग... असे बोलून त्यांनी माझा राजीनामा ठेवून घेतला,त्यांना मी इतक्या लवकर नोकरी सोडून जाईन असे अजिबात वाटले नव्हते.
एकतर ही चांगली कंपनी होती आणि सर्व सहकारी सुद्धा खूप चांगले होते पण तरी सुद्धा मी ही नोकरी सोडण्याच्या माझ्या निर्णयावर ठाम होतो.काही झालं तरी मला आयटी मध्ये शिरायचं होत आणि त्यासाठीच मी ही रिस्क घ्यायचीच असे मनाशी पक्के ठरवले होते.
इंजि. करताना जेव्हा जेव्हा माझे वर्ष वाया गेले होते त्या त्या वेळी मी कुठला ना कुठला कोर्स केलाच होता मग तो कॅडचा असो वा कॉम्प्युटर हार्डवेअरचा वा कुठला दुसरा...एकदा तर कोर्स पैसे भरून सुद्धा मी तो कोर्स पूर्णं न्हवता केला त्यामुळे वडिलांनी भरलेले पैसे थोड्या प्रमाणात का होईना वाया गेले होते आणि तरी सुद्धा वडिलांनी माझ्या या निर्णयाला पूर्णं पाठिंबा दिला होता.
मी नोकरीचा राजीनामा देण्याआधीच काही महिने वेगवेगळ्या कॉम्प्युटर कोर्सची माहिती काढून ठेवली होती,मला असा कोर्स हवा होता ज्यात मला ऑन जॉब ट्रेनिंग मिळेल...कारण त्यात तुम्हाला रियल ट्रबल शूटिंग करायची संधी मिळते.शेवटी एक कॉम्प्युटर संस्था मला योग्य वाटली आणि त्यावेळी त्यांच्याकडे अर्न अ‍ॅड लर्न या श्रेणीत मला हवा असणारा कोर्स होता.ठाण्यातही त्यांच्या संस्थेची शाखा होती परंतु तिथे जाऊन पाहिले असता छपरी विध्यार्थी आणि अतरंगी शिक्षक असा प्रकार दिसला !!! मग मूळ ब्रांच दादरला आहे असे कळल्यावर तिथे जाऊन चौकशी केली आणि एकंदर वातावरण पाहता तिथूनच कोर्स करण्याचा निर्णय मी घेतला.
कोर्स सुरू झाला आणि माझा रोजचा ठाणे-दादर असा प्रवासही...६ महिने क्लासरुम ट्रेनिंग आणि ६ महिने ऑनजॉब ट्रेनिंग असे त्या कोर्स चे स्वरूप होते.मला फार घाई झाली होती क्लासरुम ट्रेनिंग संपण्याची कारण मला जास्त रस ऑनजॉब ट्रेनिंग मध्येच होता.क्लास मध्ये चांगले मित्र मिळाले आणि अभ्यासही जोरात चालू होता...हा हा..म्हणता ६ महिने संपले देखिल.आता आमची क्लासमध्ये लेखी परीक्षा होणार होती आणि ती झाल्यावर या क्लासच्या हेडऑफिसला जाऊन तिथे परत परीक्षा आणि इंटरव्ह्यू ध्यावा लागणार होता व या सर्वात जो पास होईल त्याला ऑन-जॉब वर जाता येणार होते व महिन्याला ५ हजार स्टायपेंड मिळणार होते.या सर्वातून मी गेलो व शेवटी इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट झालो.
आता मला आणि माझ्या बरोबर इतर जणांना काही दिवस इंटर्नल ट्रेनिंग देऊन मग आम्हाला क्लायंट साईटवर पाठवणार होते.हे ट्रेनिंग जवळपास आठवडाभराचे होते आणि ते सुद्धा पटकन संपले देखील.
माझी पहिली साईट होती एक नामांकित बॅक, या बॅकेच्या शाखेची सर्व कामे आमच्या टीमला पाहावयाची होती.शेवटी माझी कॉलवर जाण्याची वेळ आली...काही तरी प्रोजेक्टरचा प्रॉब्लेम होता आणि तो नीट करण्यासाठी आम्हाला बोलवले होते.मला तर प्रो़जेक्टरचा पी पण माहीत नव्हता तर त्याच ट्रबल शूटिंग काय घंटा करणार होतो !!! पण कॉलवर जाणे तर भाग होते त्यामुळे बुडत्याला काठीचा आधार या तत्त्वाने मी माझ्या बरोबर आणखी एक साथीदार घेऊन निघालो...
त्या बॅकेत पोहचलो थोडी फार विचारणा केल्यावर असे समजले की एका कॉन्फ़रन्स रूम मध्ये मीटिंग चालू आहे आणि तिथेच तो प्रोजेक्टर ठेवलेला आहे असे कळले...आमची दोघांची तर बोबडीच वळली होती कारण आत जाऊन नक्की करायचे तरी काय याची काहीच माहिती आमच्याकडे नव्हती!!!
तरीही मी विचार केला पाहूया तर साला होतंय तरी काय नक्की...दरवाजा उघडला आणि आत गेलो तर पाहतो तर काय सुटाबुटातली सर्व मंडळी एका मोठ्याशा टेबलाभवती बसलेली होती त्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही होते, बहुधा ती बोर्ड मीटिंग असावी !!! त्यातीलच एका माणसाने मला तो प्रोजेक्टर दाखवला आणि समोर पडध्यावर त्याची इमेज छोट्या स्वरूपाची पडत आहे व ती थोडी हालत देखील आहे असे सांगितले...मी तर असा प्रोजेक्टर पहिल्यांदीच हाताळत असल्याने मनात थोडी भितीच होती कारण कुठले तरी भलतेच बटण दाबायचो आणि तो प्रोजेक्टर बंद पडायचा !!! मी जरा आजूबाजूला पाहिले तर सगळे जण माझ्याकडेच टक लावून पाहत होते की हा नक्की काय करतोय!!!
जरा इकडच्या तिकडच्या वायर्स पाहिल्या आणि तो प्रोजेक्टर ज्या कॉम्प्युटरला जोडला होता तो मला सापडला त्याच्या डेस्कटॉपवर जाऊन त्याचे स्क्रीन रिझोल्युशन वाढवले आणि समोर भिंतीवर प्रोजेक्टर थ्रू पडणारी इमेज पहिल्या पेक्षा जरा मोठी दिसायला लागली...मीटिंग मधली मंडळी जरा खूश झाली आणि माझा हा मटका नीट लागला म्हणून मी देखील. :D परंतु ती स्क्रीन अजून जराशी हालत होती ती त्यांना स्थिर करून हवी होती !!! मी मनात विचार केला आता काय करायचं ?? प्रोजेक्टरची लेन्स जराशी हालवून देखील पाहिली पण काहीही फरक पडला नाही तेव्हा हा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे त्याला मी काहीही करू शकणार नाही अशी चक्क बिनधास्त थाप मारली आणि ती त्या सर्व मंडळींना ती थाप मानवली देखील, पहिल्या पेक्षा मोठी इमेज पडध्यावर दिसते आहे त्यातच ते समाधानी झाले होते .
कसाबसा मी आणि माझा साथीदार त्या कॉन्फ़रन्स रूम मधून बाहेर आलो आणि आमच्या जिवात जीव आला. माझ्या थापे मुळे वेळ तर निभावून नेली होती पण, उगाच खोटे बोलावे लागले म्हणून जरा वाईट देखील वाटलं, धड काही माहीत असत तर निदान नीट मदत तरी करता आली असती असा मनात विचार येऊन गेला.शेवटी एकदाचा पहिला दिवस संपला तर!!!
दुसरा दिवस अजून गमतीशीर जाणार होता...

क्रमशः
मदनबाण.....

04 July 2009

माझी धडपड... भाग ४

त्यामुळे मला संपूर्ण महिन्याचा पगार मिळणे शक्य नव्हते...कार्यालयात पोहचलो आणि माझ्या आयुष्यातला पहिला पगार घेतला..१०० रुपयांच्या आठ नोटा मोजल्या...पगार.रु. ८०० फक्त.

******************************************************************

ही नोकरी करताना सुद्धा दुसरी कडे कुठे नोकरी मिळते आहे का याचा शोध चालू ठेवला होता,आता कामाची सवय झाली होती.माझ्या मॅनेजरने नाइट शिफ्ट करण्याबद्दल मला विचारले,त्या शिफ्ट साठी मी तयार आहे असे त्यांना कळवले.शिफ्टची वेळ होती रात्री १२:०० ते सकाळी ७:००. प्रथमच माझ्यावर शिफ्ट मध्ये काम करायची वेळ आली होती.मुंबई-नाशिक महामार्गावरून मी माझ्या स्कूटर वरून भिवंडीला कामावर जात असे,त्या रस्त्यावर त्यावेळी दिवे नव्हते...काळाकुट्ट अंधारात स्कूटर चालवणे हा एक दिव्य अनुभव होता...
आमच्या परिचयातल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता,त्यांच्या घरातील मंडळींना भेटण्यासाठी माझे वडील त्यांच्या घरी गेले होते,तीर्थरूपांनी सर्व विचारणा केली तसेच त्यांनीही विचारले तुमचा मुलगा काय करतो? कुठे कामास आहे? इ. त्यांच्या कुटुंबातील मुलाने वडिलांना लगेच सांगितले की ते जिथे काम करतात त्या कंपनीत सध्या एक जागा (शॉप फ्लोअर इंजि) रिक्त आहे,जमल्यास त्यासाठी अर्ज करावा.मी लगेच त्या जागेसाठी अर्ज पाठवला आणि काही दिवसातच मला इंटरव्ह्यू साठी कॉल आला.
भिवंडीतील कंपनीत नाइट शिफ्ट करून त्याच दिवशी मी त्या कंपनीत इंटरव्युसाठी गेलो,ही कंपनी एका नामांकित टीव्ही बनवणार्‍या कंपनीची उप-कंपनी होती,आणि या कंपनीत मोठ्या प्रमाणात speakers बनवले जात होते,कंपनी वसई ला होती.इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला आणि काही दिवसातच मला कामावर रुजू होण्यास सांगितले,भिवंडीतल्या कंपनीत जेमतेम २ महिनेच काम केले.
नवीन कंपनी- नवीन लोक -नवीन अनुभव.यां कंपनीत कामगार मंडळीत जास्त करून महिला वर्ग होता,आणि मुलांची संख्या तशी कमीच होती.नवघर,सातिवली इ.ठिकाणचे जवळच राहणारे हे सर्व लोक होते.माझ्यासाठी हा सर्व अनुभव वेगळाच होता...दोन मजली इमारतीत खाली आणि वर अशा दोन्ही ठिकाणी speaker चे उत्पादन केले जाई,माझा जास्त वेळ एक्स्पोर्ट डिव्हिजन मध्येच जात असे.
कंपनीतील सर्व माणसे चांगली होती.पहिले ३-४ महिने इथले काम नक्की कसे चालते ते समजण्यातच गेले. या कंपनीत परमनंट होण्यासाठी १ वर्षाचा कालावधी मला देण्यात आला होता.
आता स्कूटर जाऊन बाइक आली होती तेव्ह्या रोज ठाणे-वसई असा येऊन जाऊन ७५ किमीचा माझा रोजचा प्रवास सुरू झाला.मुंबई-अहमदाबाद महामार्गा अतिशय सुंदर आणि वेगवान असा आहे.ताशी ८०-८५ या वेगाने मी जवळपास पाऊण-एक तासातच वसईला पोहचत असे.
रोजच्या प्रॉडक्शनला लागणारी सर्व व्यवस्था करण्यातच माझा बराचसा वेळ जाई,त्यातच या कंपनीतल्या डिझाइन ऍड डेव्हलपमेंट या विभागात माझे बरेचसे सहकारी आता चांगले मित्र झाले होते.हे सर्व देखील माझ्या पेक्षा अनुभवाने,वयाने मोठे होते.या विभागात आल्यावर कॉम्प्युटरवरच वेळ घालवणे मला आवडायचे,ऑटोकॅड थोडे फार येत होते पण त्यावर जास्त काम करायची संधी नाही मिळाली.या विभागातले एक गृहस्थ बर्‍याच वेळा मी काय करतोय त्यावर लक्ष ठेवून असतं,,,त्यांना कळले की कॉम्प्युटर रिलेटेड कामात मला जास्त रस आहे.बर्‍याच वेळा ते मला भेटत तेव्हा एक वाक्य नेहमी म्हणत:-- तू इथे तुझा वेळ फुकट घालवत आहेस. (नंतर कळले की हे गृहस्थ एम.बी.ए विथ गोल्ड मेडल आहेत.:) )
तर असे दिवसा मागून दिवस गेले...आणि मी या कंपनीत १ वर्ष पूर्णं देखील केलं.(१ वर्ष एकाच ठि़काणी मी टिकीन असं त्यावॅळी मला देखील वाटलं नव्हतं :D )
एक दिवस वेगळेच वळण घेऊन आला... ते एम.बी.ए वाले गृहस्थ जे माझ्या बरोबर माझ्या बर्‍याच वेळा बोलत त्यांनी त्या दिवशी माझा क्लास घेतला...त्यांनी मला विचारले की तुला कॉम्प्युटर क्षेत्रात रस आहे तर त्याच्यातच तू तुझे करिअर का करत नाहीस तसाही तुला इथे किती पगार मिळतो फक्त ५ हजार आणि महिनत्तीच्या मानाने तो योग्य आहे का ? त्या पेक्षा सरळ नोकरी सोड आणि चांगला कॉम्प्युटरचा कोर्स कर,इथल्या पेक्षा नक्कीच जास्त पगार मिळेल तुला...मला त्याचं म्हणणं पटलं.मी वेगवेगळ्या कोर्सची माहिती जमवली वडिलांना माझा विचार सांगितला,त्यांनी फक्त मला विचारले तुला करायचे आहे ना नक्की ? माझे उत्तर होते :-- हो.
कंपनीत परमनंट होण्याचे लेटर मिळण्याच्या एक अठवड्या आधीच मी माझा राजीनामा दिला...

क्रमशः
मदनबाण.....