20 June 2009

माझी धडपड... भाग ३

३ वर्षाचा डिप्लोमा मी ६ वर्षात पूर्णं केला. आता सांगा असा मस्त रेकॉर्ड असताना मला कोण नोकरी देणार होत??? जिथे फक्त टॉपर लोकांचीच चलती असते तिथे माझ्या सारख्याचा काय निभाव लागणार होता ???
***************************************************************

नोकरी...फक्त ३ अक्षरी शब्द,पण ती मिळवताना मात्र जाम मारा-मारी असते.नोकरी नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून नोकरी मिळत नाही,हे चक्र भेदणे फार महत्त्वाचे असते.
आता वर्कशॉप कम फॅक्टरी मध्ये मला काम मिळाले होते आणि ते काय स्वरूपाचे असेल हे मला तिथे गेल्यावरच समजणार होते.पहिला दिवस उजाडला...घरातील देव्हार्‍यामधील सर्व देवांना नमस्कार केला आणि घरुन निघालो.
मिरारोडला पोहचलो, तिथेच होता तो वर्कशॉप.त्या ठिकाणी अशाच प्रकारचे अनेक वर्कशॉप होते,आणि त्या ठिकाणी वेगवेगळी कामे चालू होती.मला ज्या वर्कशॉप मध्ये जायचे होते तिथे पोहचलो...अगदी कोनाड्यात बांधला होता,इमारत २ मजल्याची होती आणि बांधणीही मजबूत वाटत होती.आत जाताच वर्कशॉपचा मालक भेटला...खरे तर त्या वर्कशॉपचे दोन मालक होते, कारण तो वर्कशॉप दोन गुजराती लोक भागीदारी मध्ये चालवत होते.मला भेटलेला त्या पैकीच एक होता...बोलायला मोकळा,,,हसरा आणि माणुसकी असणारा असा तो मला भासला...त्याने मला त्याच्या केबिन मधे बोलवले आणि एका पोर्‍याला हाक मारून माझ्यासाठी चहा मागवला...चहा घेतात इकडचे तिकडचे बोलणे झाले आणि तो म्हणाला इथे काय काम चालतं ते नीट बघ आणि शिकून घे,मी होय असे म्हटले आणि त्याच्या केबिन मधून बाहेर पडणार होतो तेव्हढ्यात एक माणूस केबिनच्या आत आला...हा दुसरा पार्टनर होता...त्याने मला पाहताच पहिल्या पार्टनर ने माझी त्याच्याशी ओळख करून दिली...हा दुसरा बंधू जरा डांबीस वाटला,,,त्याच्या हसण्यातली कृत्रिमता मला जाणवली.
मी केबिनच्या बाहेर पडलो आणि दुसर्‍या मजल्यावर गेलो.तिथे काही कामगार एक मोठ्याश्या डायवर काम करत होते...त्यांच्या जवळ गेलो आणि ते काय काम करत आहेत याच निरीक्षण करू लागलो...थोड्यावेळातच त्या कामगारांबरोबर माझी ओळख झाली,अगदी गरीब मुले होती.त्यांच्याशी बोलताना तिथे काय काय काम चालत याचा थोडा अंदाज आला...आता काही दिवसातच मला इथली कामे लक्षात घेऊन याच कामगाराकडून ती नीट करून घ्यावी लागणार होती...
एक आठवड्यातच मला बर्‍याच गोष्टी समजल्या...या दोन गुज्जु पार्टनरीची आपापसात बनत नव्हती आणि एक-दुसर्‍याचे काम अडवणे हाच प्रकार जास्त चालत असे,जो दुसरा पार्टनर मला डँबिस वाटला होता तो खराच तसा होता आणि त्याच्या कडूनंच कामामध्ये अडवणूक जास्त प्रमाणात होत होती.
या ठिकाणच एकंदर वातावरण मला कळलं होत आणि इथे काही शिकण्याची संधी नाही मिळणार हे देखील उमजलं होत.
एका मराठी वर्तमानपत्रातील नोकरीच्या जाहिरातीला वाचून मी तिथे अर्ज पाठवला होता त्या अर्जाचे उत्तर येऊन मला मुलाखतीसाठी बोलवणे आले होते, हा अर्ज मी बरेच दिवसा पूर्वी केला होता आणि तिथून काही उत्तर येईल अशी अपेक्षा केली नव्हती,,,कंपनी होती भिवंडीला...मी एक दिवस वर्कशॉपला कामावर न जाता त्या कंपनीच्या मुलाखतीला गेलो.पोस्ट होती ट्रेनी ऑफिसर,कंपनी बरीच मोठी वाटली...मुलाखत होऊन जे ३ जण निवडण्यात आले त्यातलाच मी देखील एक होतो.
मुलाखत घेणार्‍यांनी काही अटी सांगितल्या...१) कामावर रुजू झाल्यावर दीर्घकालीन रजा मिळणार नाही.२)शिफ्ट मध्ये काम करावे लागेल.इ.इ.मी सर्व अटी मान्य केल्या आणि ज्या वर्कशॉप मध्ये कामाला जात होतो त्याला सायोनारा म्हंटले.
या भिवंडी मधील कंपनी मध्ये बरेच कामगार होते...मोठं मोठी यंत्रे होती...या सर्व कामगारावर लक्ष ठेवून त्यांच्या कडूनं नीट काम करून घेणे ही माझी टास्क होती. इथले सर्व कामगार माझ्या पेक्षा वयाने, अनुभवाने मोठे होते.बर्‍याच जणांची बोली आगरी भाषाच होती...मी कामावर रुजू झाल्यावर तिथे आधी पासून काम करणारे लोक (ऑफिसर) माझ्याकडे आले आणि त्या कंपनीत नक्की कसं कस काम केलं जात हे नीट समजवून सांगितलं...मटेरियल इश्यू करण्यापासून ते असेंब्ली लाइन पर्यंतचे सर्व काम नीट समजवण्यात आले.
इथे एक नवीनच पद्धत मला पाहायला मिळाली,,,ती म्हणजे या कंपनीचा मोठा साहेब रोज एक फेरी संपूर्ण प्लांट मारत असे...तेव्हा प्रत्येक मशीन समोर त्या कामगाराने करायचे त्या दिवशीचे काम खडूने जमिनीवर लिहून ठेवलेले असायचे आणि ते काम तो वाचत असे,,,ज्या दिवशी ते लिहिलेले दिसले नाही तेव्हा तो जाम उखडत असे.
जवळपास १५ दिवसातच मला जवळपास सर्व काम कळले होते आणि कामगार मंडळींशी जवळीक सुद्धा साधता आली होती.कामगारांशी जुळवून घेणे आणि त्यांच्याकडून काम करवून घेणे ही एक कला आहे आणि ती मी हळूहळू शिकू लागलो होतो.कामगारांना त्यांचा कामातली सर्व माहिती असते त्यामुळे माझ्या सारख्या नवशिक्या पोराकडून काही ऐकणे म्हणजे फार लांबची गोष्ट झाली.त्यांच्या भाषेत हा कोण चार पुस्तक शिकून आला आणि आमच्या कामावर लक्ष देणार म्हणे !!!
या कंपनीतला माझा पहिला महिना संपला आणि पगाराचा दिवस आला....कंपनीत मी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात रुजू झालो होतो त्यामुळे मला संपूर्ण महिन्याचा पगार मिळणे शक्य नव्हते...कार्यालयात पोहचलो आणि माझ्या आयुष्यातला पहिला पगार घेतला..१०० रुपयांच्या आठ नोटा मोजल्या...पगार.रु. ८०० फक्त.

क्रमशः
मदनबाण.....

14 June 2009

माझी धडपड... भाग २

नोकरीला सुरुवात होणार होती पण, मला हे पहिले सांगितले पाहिजे की, मला नोकरीवर कोणी ठेवून घेईल असे कधी वाटलेच नव्हते !!! कारण...माझं शैक्षणिक आयुष्य एकदम सरळ नव्हत !!! नोकरी देताना अर्थात शैक्षणिक पात्रतेला महत्त्व दिले जाते आणि माझ्या इतका रानटी प्रोफाइल बहुधा कोणाचीच नसावी.इयत्ता ८ वी पर्यंत मी एक सर्वसाधारण विध्यार्थी होतो...पण आता एक वेगळंच वळण लागणार होत.९वीत असताना शेवटच्या वार्षिक परीक्षेच्या वेळी मी आजारी पडलो...आणि माझे दोन पेपर बुडले...तरी सुद्धा मी कसा बसा पास झालो कारण वर्षभरात झालेल्या सर्व परीक्षांमध्ये मला चांगले मार्क होते.आजारी पडण्यासाठी कारण होता ताप.एका चांगल्या डॉक्टरकडे गेलो...त्याने केलेले तापाचे निदान होते मलेरिया...या डॉक्टरने बरेच दिवस मलेरियाची ट्रिटमेंट मला दिली...पण तब्येत काही ठीक होईना म्हणून दुसर्‍या डॉक्टरकडे गेलो... ते म्हणाले कोणी सांगितले मलेरिया झाला आहे? आधी ती औषधे थांबवा !!!...माझी तब्येत जरा सुधारली.१०वी चे वर्ष चालू झाले आणि मी पुन्हा आजारी पडलो...बहुधा आधी अतिप्रमाणात खाल्ल्या गेलेल्या मलेरियाच्या औषधाचा तो परिणाम असावा!!!...बरेच औषध उपाय केले पण मी घरीच होतो...अगदी बेडवर झोपून.मला भेटायला शाळेतले मित्र यायचे नेहमी विचारायचे केव्हा परत येशील वर्गात??? माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर मात्र नव्हते. १०वीच अख्खं वर्ष वाया गेलं.ज्या वर्षाला एका विध्यार्थ्याच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व असतं...ते वर्ष माझ्यासाठी सुटलं होत..."विध्यार्थीदशा" खरंच माझी दशाच सुरू झाली होती नुकतीच...पण मी डगमगलो नाही परत शाळेत १०वी साठी रिअ‍ॅडमिशन घेतली...आणि वर्षभर मेहनत घेतली (ती सुद्धा एकदापण आजारी न पडता ;) )...फस्टक्लास मिळाला... मला अभियांत्रिकी शाखेत जाण्याची इच्छा होती ,, जास्त करून कॉम्प्युटर विभागात...विचार केला जर संधी मिळाली तर कॉम्प्युटर शाखेला जाईन नाही तर मेकॅनिकल.माझे वडील ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीचे स्वतःचे असे कॉलेज आहे तिथे प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला पण ऍडमिशन मिळाली नाही!!!काही टक्के कमी होते मला...मग माझ्या घरा जवळच असणार्‍या एका प्रायव्हेट कॉलेज मध्ये प्रयत्न सुरू केले...मनात विचार होता की कॉलेज घरा जवळ असेल तर अभ्यासाला भरपूर वेळ देता येईल.शेवटी या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला पण शाखा होती प्रॉडक्शन.
वडिलांनी पोटाला चिमटा लावून इथून तिथून करून कसे बसे पैसे गोळा करून मला इंजि.ला घातले होते,आता चांगलं शिकणं ही माझी जवाबदारी होती.पाहिलं वर्ष सुरू झालं...दिवस मजेत होते एक वेगळंच वातावरण अनुभवायला मिळत होत.कानावर एकदम कधीही न ऐकलेले इंग्रजी शब्द पडत होते...मी मराठी माध्यमातून आलो होतो त्यामुळे सुरवातीला आलेला प्रोफेसर काही तरी अगम्य बोलतोय असे वाटायचे आणि मला ते काय घंटा समजायचं नाय!!! असेच काही दिवस गेले...आता बर्‍यापैकी समजायला लागलं होत....प्रॅक्टिकल...अभ्यास...एकदम व्यवस्थित चालू होत...पण इतकं सहज वाटत होत तसं घडणार मात्र नव्हतं.परत माझी प्रकृती ढासळायला सुरुवात झाली...कॉलेज मध्ये मधे बुडायला लागलं...आणि परत...तीच वेळ समोर आली...मी अभ्यासात मागे पडत चाललो होतो आणि बाकीचे पुढे गेले होते... काही श्रीमंत बापाची पोर माझी टिंगल देखील करायची...हसायची म्हणायची तुझं इंजिं सुटलं आता...तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस.आणि शेवटी माझी पहिल्या वर्षी विकेट उडाली.या माझ्या तब्येतीच काही तरी करायला हवं होतं.वर्ष वाया गेलं की कसं वाटतं त्याचा माझ्यासाठी हा आता दुसरा अनुभव झाला होता.
ऑक्टोबर मध्ये सर्व विषय क्लियर केले आणि सेकंड इयर साठी सज्ज झालो...बरेच वेगळे विषय या वर्षी अभ्यासक्रमात होते...शिकायला मजा येत होती...सायको आम्हाला इंजि>ड्रॉइंग या विषया करता होता...त्याचा त्रास आता कुठे सुरू झाला होता...४ तास महिनत करून काढलेली ड्रॉइंग शिट तो ४ सेकंदात फाडून टाकायचा...पण तो अजून माझ्यावर "प्रसन्न" झाला नव्हता.त्यामुळे या वर्षी पुरता वाचणार होतो...वर्ष व्यवस्थित गेलं...शेवटची परीक्षा आली.माझी तयारी कितपत झाली आहे हे मला पूर्णं माहीत होत. ३ केट्या लागल्या तरी पुढच्या वर्षात जाता येत होत आणि जर अजून एका विषयात दांडी गुल झाली तर मात्र वर्ष वाया जायचे.
मला २ ते ३ विषयात केटी लागणार याची जवळपास खात्री होती कारण त्या विषयाचा माझा अभ्यास पूर्णं झाला नव्हता...परंतु मी शेवटच्या वर्षाला मात्र नक्की पोहचीन असे मला वाटले होते...
परीक्षा सुरू झाली ...पेपर व्यवस्थित गेले...शेवटचा पेपर होता...इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी. ५० मार्काचा पेपर होता... अगदी सोपा विषय होता...मी आरामात सोडवला तो पेपर आणि माझ्या पुढच्या बाकावर बसलेल्या विध्यार्थ्याने देखील...माझा सर्व पेपर तसाच्या तसा त्याने उतरवून काढला होता.
मी गणित,मेकॅनिक्स आणि ड्रॉइंग या विषयात मला केटी लागणार असे धरून चाललो होतो कारण त्या विषयाचे पेपर मला कठीण गेले होते.
रिझल्टचा दिवस आला...नियती पुन्हा माझ्यावर हसली...आणि मी रडलो... ४ विषयात माझी बत्ती गुल झाली होती आणि ते विषय होते गणित,मेकॅनिक्स,ड्रॉइंग आणि इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी.
इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी मध्ये माझी विकेट उडणं शक्यच नव्हतं कारण तो पेपर तर मी अगदी सही सही सोडवला होता...त्याच विषयात फक्त ४ मार्कांनी कमी पडल्यामुळे माझं वर्ष वाया गेलं...पुन्हा अपयश !!!
आणि ज्याने माझा तोच पेपर संपूर्ण उतरवून काढला होता तो मात्र पास झाला होता...त्या विषयात देखील!!!रिचेकींग,,रिव्हॅल्युएशन करून काही होत नाही हे माहीत असून देखील तो प्रयत्न मी त्या पेपराच्या बाबतीत करून पाहिला...पण काही उपयोग झाला नाही.
केटीची परीक्षेची तयारी चालू केली...मला ठाम खात्री होती गणित हा विषय काही माझ्याच्यान इतक्या लवकर सुटायचा नाही...तरी पण परीक्षा देणं तर भाग होत...सर्व विषयाच्या परीक्षा दिल्या आणि गंमत म्हणजे मी गणिताच्या पेपरात चक्क पास झालो होतो तेही १० मार्काच्या ग्रेस मुळे... जे मिळणं माला तरी शक्य वाटलं नव्हतं!!! ४ मार्कांनी नापास झाल्यावर मी ज्या बोर्डाला शिव्यांची लाखोली वाहिली होती त्याच बोर्डाला मी आता मनभरुन भरून धन्यवाद देत होतो.
आता सरते शेवटी ३र्‍या आणि शेवटच्या वर्षाला पोहचलो आणि सायको महाराज माझ्यावर "प्रसन्न" झाले. (सायको प्रकरण वाचावे...)
माझ्या आयुष्यात अशी पहिलीच वेळ आली होती की मला कळलं ही आत्महत्या करणार्‍याच्या डोक्यात कसे विचार येत असतील ते...कारण तसे विचार आता माझ्या डोक्यात तरळत होते...सायको माझ्या मानगुटीवर बसला होता...आणि मी मात्र त्याच्या त्रासामुळे पूर्णपणे हतबल झालो होतो...एकदा मनात असा विचारही आला होता की कुठून तरी मला कट्टा मिळाला असता तर मी त्याला सरळ ढगात पोहचवला असता!!!....असो तसे काही घडले नाही पण परत हेही वर्ष वाया गेले.परत परीक्षा देली आणि सरते शेवटी मी कसा बसा "पास आऊट" झालो.
३ वर्षाचा डिप्लोमा मी ६ वर्षात पूर्णं केला. आता सांगा असा मस्त रेकॉर्ड असताना मला कोण नोकरी देणार होत??? जिथे फक्त टॉपर लोकांचीच चलती असते तिथे माझ्या सारख्याचा काय निभाव लागणार होता ???


क्रमशः
मदनबाण.....

13 June 2009

माझी धडपड... भाग १

मोठ्या मुश्किलीने मी कॉलेज पास आऊट झालो...मुळात सायको प्रकरणामुळे मला कधी पास होऊन बाहेर पडता येईल असे वाटलेच नव्हते!!! माझ्या इंजि.डिप्लोमा कधी पूर्णंच होऊच शकणार नाही असेच मला वाटले होते.
पण एकदाचा सुटलो मी...डोक्यात इतका ताण भरलेला होता की पुढे शिकायची इच्छाच शिल्लक उरली नव्हती.तरी सुद्धा मनात सेफ्टी इंजिं करण्याचा विचार चालू होता,त्याची माहिती मिळवण्यासाठी टेक्निकल बोर्डाचे वांद्रे येथील कार्यालय गाठले...बरीच चौकशी करून योग्य माहिती कुठल्या विभागात मिळते ते शोधले व तिथे जाऊन पोहचलो... अगदी सरकारी दमात काम चालले होते...४,५ जण तिथे आपापले काम करत बसले होते...एका दोघांना विचारून पाहिले शेवटी त्यांनी सांगितलेल्या जागी गेलो व त्या अधिकार्‍याला कोर्स विषयी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला...त्याने माझे नाव विचारले...ते सांगताच अत्यंत उर्मटपणे एक कागद अंगावर भिरकावला !!! (जात समजली-ना त्याला माझी!!!)
दगडावर डोके आपटले तरी त्याला काहीही फरक पडत नाही पण डोक्याला मात्र पडतो असा विचार करून त्या उर्मट माणसाशी कोणताही वाद न घालता त्याने भिरकावलेले ते माहिती पत्रक घेऊन घरी आलो....वडिलांना सर्व सांगितले,,तो कोर्स पुण्याच्या एका प्रायव्हेट कॉलेज मध्ये शिकवला जातो हे अजून माहितीचा शोध घेतला असता कळले!!!
मी आणि तीर्थरूप पुण्याला हिंजवडी भागात पोहचलो,,,रिक्षा धरून कॉलेजच्या दिशेने निघालो...अर्ध्या रस्त्यातच आम्हा इथं पर्यंतच येतो असे म्हणून रिक्षावाला थांबला...आमच्या कडून पैसे उकळून स्वारी पसार झाली!!! पुण्याचे रिक्षावाले प्रामाणिक असतात याची साक्ष पटली...असो...
पायपीट करत करत कॉलेजच्या आवारात पोहचलो...एकंदर वातावरण वेगळंच भासलं,,,श्रीमंत बापाची पोरटी टवाळक्या करत होती...तर काही मुली त्यांच्या बॉय मित्रा बरोबर प्रेम चेष्टा करण्यात व्यग्र होत्या...कॉलेजच्या ऑफिस मध्ये अजून कोणीही आले नव्हते...बराच वेळ वाट पाहिली मग शेवटी एकदाचे अधिकारी मंडळ आले...त्यांनी आपल्या कॉलेजची महती सांगितली...(त्यांनी सांगण्या आधीच ती आम्ही बाहेरच प्रत्यक्षात पाहिली होती..) मग पैशाची बोलणी सुरू झाली...(अहो शिक्षण हा धंदाच आहे हल्ली...जरा विचार करा ना !!! सगळ्या मंत्री-संत्री लोकांना अशी मेडिकल,इंजि.कॉलेजच का काढावी वाटतात...ग्रामीण भागात शाळा का नाही काढावी वाटत??? )
मी आणि वडिलांनी एकमेकांच्या चेहर्‍याकडे पाहिले...कॉलेज प्रवेशाचे फॉर्म घेतले...किंमत-- २५० का ३०० रु. होती बहुधा.(असे फॉर्म वाटूनच किती कमाई करत असतील याचा अंदाज आला.)
मुंबईला परत आलो...
एकंदर सर्व परिस्थिती पाहता,,,हा कोर्स करण्याचा विचार मी सोडून दिला...आता काय करायचं ???
अर्थात नोकरी...अजून दुसरं काही करणं त्यावेळी शक्य नव्हतंच मुळी.
आता नोकरीचा शोध सुरू झाला...वेगवेगळ्या एजन्सी मध्ये जाऊन तिथे जाऊन फॉर्म भरणे,सिव्ही देणे.इं.पेपरात येणार्‍या जाहिराती पाहणे आणि तिथे अर्ज पाठवणे...हा क्रम अखंड चालू होता !!! पण नोकरी मिळण्याची काही चिन्हे दिसत नव्हती !!!
शेवटी एका कंपनीतून बोलवणे आले...ती कंपनी माझ्या घराच्या पासून जवळच होती...
आता फक्त इंटरव्ह्यूला तयारी करून जाणेच बाकी होते...
शेवटी तो दिवस आलाच...Turnkey Contract घेणारी ती कंपनी विविध उपकरणे बनवणारी होती.
इंटरव्ह्यू व्यवस्थित पार पडला आणि त्यांनी परत २ दिवसांनी बाकीची औपचारिकता पूर्णं करण्यासाठी बोलवले....दोन दिवसांनी जेव्हा त्यांच्या ऑफिसामध्ये पोहचलो तेव्हा त्यांनी मला वेगवेगळ्या अटी सांगण्यास सुरुवात केली...त्यातील बर्‍याचश्या मला पटल्या पण शेवटची अट होती की दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम ते माझ्या पगारातून काढून घेणार होते...मी कारण विचारले तर जरासे गोलमोल उत्तर मिळाले त्या वेळी मी ठीक म्हणालो पण विचार केला आधीच तो पगार केव्हढासा देणार त्यात सुद्धा हे लोक काटछाट करणार ते सुद्धा कुठलेही न पटणारे कारण देता !!!
म्हणजे काम करायचं पण पगार मात्र अर्धाच घ्यायचा !!! हे काही माझ्या मनाला पटण्यासारखे नव्हते.
अजून कामावर जाणे सुरू करण्यास वेळ होता...तो पर्यंत एका दुसर्‍या वर्कशॉप कम फॅक्टरी मध्ये नोकरी मिळण्याची चिन्हे दिसू लागली होती...तिथे वेग वेगळं डाय आणि टुल्स बनवले जात होते.
शेवटी त्या वर्कशॉप मध्येच काम करण्याचा निर्णय घेतला...पहिल्या कंपनीचा फोन आला त्यांना कळवले की मी दुसरीकडे कामावर जाऊ लागलो आहे.

(दुसरा भाग डोक्यात केमिकल लोच्या सुरू झाल्यावरच लिहीन...)

क्रमशः
मदनबाण.....

09 June 2009

वासुदेव !!!

महाराष्ट्रात असलेल्या अनेक परंपरेतील ही एक...सकाळी सकाळी भगवंताच्या नाम संकिर्तनाने इतरांना "जागे" करणारा असा हा वासुदेव...आता ही भाव-परंपरा लोप पावत चालली आहे याची मात्र काळजी वाटते!!!

08 June 2009

क्लायंट क्लायंट

ही गोष्ट आहे जवळपास २ वर्षा पूर्वीची,,,स्थळ:--- डेन्मार्क, कारण :--- एक प्रोजेक्ट तिथे जाऊन शिकणे आणि मग भारतात परत येऊन तो प्रोजेक्ट चालू करणे.( पार्ट ऒफ़ ओडीसी)
आता तिथे पोहचून बहुधा १ महिनाच झाला असावा...काम आता बरेचसे समजले होते.शनी आणि रवी आम्ही कामावर यायचो,,, म्हणजे आता देखिल येतोच !!!!!पण तिथे परिस्थिती जरा वेगळी होती...कंपनीची इमारत जरा शहरा पासून लांब होती...जराशी एकांतात असावी तशीच.कंपनीच्या आवारातच जिथे प्रवेशाचे दार होते तिथे एक स्विच होता त्या स्विचला छोटीशी बटणे होती,ती दाबून आपला पास कोड दाबायचा आणि आपलकडचं आयडी कार्ड त्यावर टेकवायचं,,, कोड जुळला....दरवाजा अघडला!!! आपल्या इथं जसे गेटवर स्किक्युरिटी असते...तीन,चार रखवालदार असतात तसा हा प्रकार नाही.
मी आत गेलो की दरवाजा बंद...पुढील ८ तासासाठी त्या अख्ख्या प्लांट मध्ये मी पुर्णपणे एकटा...
आज शनिवार आहे...त्यामुळे या प्लांट मध्ये मी माझी ८तासाची शिफ्ट करायला आलो होतो. कामावर आठ तासाच्या शिफ्ट करताना माझे सोबती:- माझा एक लॆपटॊप एक पिसी आणि फोन.
रात्री १२०० ते सकाळी ७.00 अशी अशी झकास वेळ :)कामात बराचसा वेळ निघून गेला आता पहाट झाली होती काही वेळांनीच माझ्या टीम मधला बंधू त्याची शिफ्ट करायला आला...आम्ही एकमेकांना शिफ्ट अपडेट्स दिले आणि मी हॊटेल मध्ये माझ्या रूम वर परत जाण्यासाठी निघालो....बराच प्रवास करून शेवटी रूम वर आलो...चावी लावली दरवाजा उघडला...बूट काढले...हातातली बॆग तशीच टाकली सरळ बेड वर जाऊन पडलो...जाम थकलो होतो...आणि बाहेर -१२ असताना प्रवास करणे म्हणजे टाळक्याला ताप !!! साला ते उत्तर ध्रुवावर एस्किमो कसे दिवस काढत असतील!!! असा विचार केला आणि गप्प झालो...
इतका थकलो होतो की बास्स्स... हळूच मान फिरवली आणि छताकडे पाहिले...छतावरती जणू आरसाच लावला आहे आणि ज्यात मी स्वतः:ला पाहतोय असेच भाव मनात आले!!!
थोडासा हसलो आणि म्हणालो साला.. हलकट ही, झोप काही येत नाही!!!
मी प्रयत्न पूर्वक झोपण्याचा प्रयत्न करत होतो, आणि झोप मात्र माझ्याशी लपंडाव खेळत होती...आता थोडीशी झोप डोक्यात शिरली होतीच तेव्हढ्यात माझा मोबाईल वाजला...हिंदुस्थानातून होता...माझ्या बॊसचा...तो म्हणाला की, क्लायंटने मेल/फोन करून विचारले आहे एक्स्ट्रा शिफ्ट करण्याबद्दल!!! त्यांचा माणूस आजारी होता म्हणून तो शिफ्ट करू शकत नव्हता...त्याची शिफ्ट आमच्या टीम ने करावी अशी विचारणा त्या मेल मधे होती.
तुम्ही करू शकाल का ? बॊस ने विचारलं:...मी: हो. जमेल?बॊस: मी: हो.
बेड वरून उठलो फक्त २ तासच झोप झाली असावी बहुधा ...तसाच उठलो पटकन तयार झालो...आणि परत शिफ्ट करण्यासाठी रूमच्या बाहेर पडलो...ऒफ़िसला जाण्यासाठी.
क्लाय़ंटचा प्रत्येक शब्द तुम्हाला झेलावा लागतो...त्यांनी विचारणा केली शिफ्ट करता येईल का? आता या प्रश्नावर आम्ही नाही म्हणूच शकत नाही कारण... क्लायंट हमारा भगवान है।त्याच्यामुळेच तर आम्हाला काम मिळणार असतं...त्यामुळे त्यांनी टाकलं की आपण झेलायचं हे तत्त्व लागू होत!!! :)
माझा माझ्या हॊटेल ते कंपनी हा प्रवास एकदम सॊलिड होता....पहिले बस धरा...मग ६ स्टॊप नंतर उतरा(कारण ते रेल्वे स्टेशन आहे)आता इथून ट्रेन धरायची मग अंदाजे पाऊण तास झाला की माझे नेहमीच स्टेशन यायचं तिथे उतरायचं आणि तिथूनच पुढे जाणारी बस धरायची आता ३ स्टॊप गेले की उतरायचं आणि परत माझ्या ऒफ़िसच्या मार्गावर जाणारी अजून एक बस धरायची साधारण अर्धा तासातच ऒफ़िसचा स्टॊप यायचा.
आता मी त्या बस स्टॊप वर उभा होतो जिथून माझी कंपनी अर्ध्या तासतच होती....बराच वेळ झाला बस काही येईना !!! मग सहज बस स्टॊप वर बाजूला लावलेले वेळापत्रक पाहिले !!! आयला अजून एक तास बसच नव्हती ???मग मी वेळेवर कसा पोहचणार आणि नाही पोहचलो तर क्लायंट भरपूर कौतुक करणार !!!
विचार केला,,, परत दुसरी बस धरून रेल्वे स्टेशन गाठावे आणि ट्रेन धरून पुढील स्टेशनवर उतरून तिथून मिळणारी बस धरावी ?
पण स्टेशनला जाणारी बस सुद्धा आता १ तासानेच होती आणि हा बसच्या वेळांमधला फरक झाला होता कारण शनी आणि रवी बस फेर्‍यांची संख्या कमी असते !!!
आता काय करायचं??? मोबाईल काढला आणि टॆक्सी सेवा देणाया कंपनीला कॊल केला... त्याला मी बस स्टॊपचे नाव सांगायचा प्रयत्न केला पण त्याचं इंग्रजी माझ्ह्या सारखच्च्च काही जास्त चांगलं नव्हत. ;)
त्यांना मी कुठे उभा आहे त्याचा संपूर्ण पत्ता विचारला!!! च्या मारी मला तर फक्त बस स्टॊपच नाव दिसलं पण आजूबाजूला पत्ता काय माहीत नव्हतां !!! हे म्हणजे एका जपानी माणसाला मुलुंड स्टेशला उभे करून सीप्झला जाणारा मार्ग कुठे आहे ? असं विचारण्यासारखं होत तेही हिंग्लीश मध्ये म्हणजे (हिंदी+इंग्लिश)
त्या टॆक्सी ऒप्रेटरला काही समजवून देऊ शकलो नाही... फोन बंद केला.आता करायचं वेळ तर कमी होत चालला होता...आणि मला काहीही झालं तरी वेळेवर पोहचायचे होते.
तेवढ्यात मला समोर लांब रस्त्यावर एका चौकापलीकडे उभा असलेला माणूस दिसला...मनात आलं हाच काय ती माझी मदत करू शकेल!!! त्याच्याकडे मी निघालो...रस्ता ओलांडला आणि त्याला मी माझ्या बद्दल माहिती सांगितली आणि मला कसं ऒफ़िसला पोहचणे महत्त्वाचे आहे ते समजावले(म्हणजे तसा समजावण्याचा मी प्रयत्न केला. :) ) त्याला मी सांगितलं की हा घे माझा मोबाईल आणि या वरून टॆक्सी सेवा देणाया कंपनीला फोन कर आणि मी कुठे उभा आहे याचे लोकेशन त्यांना कळव...तो काहीच बोलला नाही...स्वतः:च्या खिशातून मोबाईल काढला आणि कुठलासा नंबर फिरवला आणि बोलू लागला... मला कळेनाच की, मी जे काय इतका वेळ प्रवचन दिले ते त्याला समजले का ? तेव्हढ्यात तो म्हणाला इथेच थांब !!! एव्हढ्यात एक बस आली समोर आली तो माणूस ती बस चढून निघून गेला देखील!!! त्याने नक्की टॆक्सी कंपनीलाच फोन केला असेल का ? का तो त्याच्या कोण्या मित्राबरोबर बोलत होता?...पण तो म्हणाला होता इथेच थांब!!!
मी तेच ठरवले तिथे तसेच उभे राहिचे ...तापमान बरंच खाली आलं होत...आणि त्यातच बोचरा वारा वेगात वाहत होता....थोड्याच वेळात तिथे एक टॆक्सी आली आणि त्याने मला पाहून विचारले तुम्हीच टॆक्सीची वाट पाहत उभे आहात ना ?मी हो म्हणालो...गाडीत बसलो तापमान दर्शक -१५ दाखवत होत.
शेवटी प्रवास करून ऒफ़िस मध्ये पोहचलो पिन कोड दाबला ...पुन्हा ८ तासासाठी एकटा बंद.

मदनबाण.....